आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र, मराठवाड्यात 51 जणांना मुंडण करून केला सरकारचा निषेध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- परळी येथे 18 जुलैपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेकडो समाजबांधवांनी सरकारविरुद्ध उघड नाराजी व्यक्त करत रोष व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, सोलापूरमध्ये आंदोलकांनी एका बसला आग लावली, दगडफेकही केली.

 

दरम्यान, परळीतील या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे.  पाटोदा येथे सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून 51  जणांनी मुंडण करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. बीड तालुक्यातील घाटसावळी येथे बंद पाळण्यात आला असून ढेकणमोहा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजलगाव येथे शुक्रवारी झालेल्या लाठीमाराचे पडसाद शनिवारी वडवणीत उमटले. येथे आंदोलकांनी निषेध मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. 

 

नांदेड जिल्ह्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. अर्धापुरात आरक्षण समर्थकांनी एका बसवर दगडफेक केली. नांदेड, धर्माबाद, हिमायतनगर येथेही आंदोलन करण्यात आले. जालना जिल्ह्यात परतूर येथे सामूहिक मुंडण करण्यात आले.

 

सोलापुरात जाळपोळ, दगडफेक
सोलापूर- बार्शी महामार्गावरील वडाळा गावाजवळ आंदोलकांनी दगडफेक करुन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आठ बसची तोडफोड केली तर एका बसला आग लावली. या घटनेमुळे बार्शी-सोलापूर मार्गावरील प्रवाशी वाहतूक बंद पडली. या रस्त्यावर धावत असलेल्या उर्वरित बसेस पोलिस बंदोबस्तात शहरात आणण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...