आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दानवेंच्या लोकसभेतील ‘वन वे’चा चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी ‘अर्जुना’च्या ‘बाणा’वर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने गुरुवारी औरंगाबाद येथील बैठकीत चाचपणी केली. यात संपूर्ण मराठवाड्याचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत तर देण्यात आलेच, शिवाय खोतकरांनाही तयारीच्या सूचना देण्यात आल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दानवे-खोतकर यांच्यात पेटलेले शीतयुद्ध  पुढील काळात निवडणूक रणांगणातील  युद्धात परावर्तीत होण्याची शक्यता आहे.


गेल्या दीड वर्षापासून भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील शीतयुद्ध चांगलेच पेटले आहे.  यातूनच  खोतकर यांनी जालना लोकसभा डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे खासदार दानवे यांनीही संपर्क वाढवला आहे. विशेषत:  खोतकर यांच्या जालना विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी सुरू
केली आहे.

 

कार्यकर्ते स्वबळावर लढण्यासाठी सज्ज
गुरुवारी औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यात जालना जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुका लढाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना रोखण्यासाठी  खोतकरांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणीही काही पदाधिकाऱ्यांनी केली. पदाधिकाऱ्यांचा कल पाहून ठाकरे यांनीही खोतकरांना तयारीचे संकेत दिल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले. मंत्री खोतकर यांनी अगोदरच लढण्यासाठी तयारी सुरू असताना त्याचच औरंगाबाद येथील बैठकीत पक्षप्रमुखांनीच संकेत दिल्याने खोतकर आपल्या बाणाने लोकभेचा चक्रव्यूह भेदण्यास सज्ज झाले आहेत.

 

युती तुटल्यानंतर मैत्रीत वितुष्ट
दानवे-खोतकर यांच्यात गेल्या २५ वर्षांपासून राजकीय मैत्री आहे. या कालावधीत राज्य व स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमध्ये अनेक वेळा वाद झाला, तणावाचे प्रसंग आले. मात्र या दोघांची मैत्री अभेद्य राहिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर खोतकर यांच्याविरुद्ध भाजपने तगडा उमेदवार देऊन त्यांच्या पराभवाची व्यूहरचना आखली. तर शिवसेनेने दानवे यांचे पुत्र संतोष यांच्याविरुद्ध भोकरदन विधानसभा मतदारसंघात परतफेड केली.  तेथूनच या वादाची ठिणगी पडली.

 

दानवेंची जालन्यातून तयारी
मंत्री खोतकर यांनी जालना लोकसभेसाठी आक्रमक पद्धतीने तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या रणनीतीला शह देण्यासाठी खासदार दानवे यांनी जालना विधानसभा मतदारसंघात अधिक लक्ष घातले आहे. खासदार दानवे यांना केंद्रातून राज्यात यावेच लागले तर ते जालना विधानसभा मतदारसंघातूनच लढतील, अशी चर्चा भाजपचे पदाधिकारी करीत आहेत. जालना शहर व ग्रामीण भागात पक्षबांधणीची जबाबदारीही दानवे यांचे बंधू तथा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

 

स्वबळावरच लढण्याची मागणी

आगामी सर्व निवडणुका शिवसेनेने स्वबळावरच लढवाव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राज्य सरकारची  कर्जमाफी फसवी ठरल्याने शेतकरी नाराज आहेत. तर जीएसटी व नोटबंदीमुळे सर्वांचेच हाल होत असल्याने त्याचा भाजपला फटका बसणार आहे. त्यामुळे स्वबळावर लढणेच योग्य राहील, असे कार्यकर्त्यांचे ठाम मत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, दोघांची बलस्‍थाने...

बातम्या आणखी आहेत...