आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JALNA: रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकरांतील ‘महाभारता’त वैयक्तिक ‘वस्त्रहरण’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. गेल्या वर्षभरापासून महाभारताचे संदर्भ देऊन दोघेही एकमेकांवर शरसंधान साधत होते. मात्र गुरुवारी एका चर्चेत त्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केल्याने दोघांमधील वादाच्या ‘महाभारता’त आता भ्रष्टाराचाराच्या आरोप-प्रत्यारोपाच्या ‘वस्त्रहरण’ नाट्यास सुरुवात झाली आहे.

 

त्यामुळे आगामी काळात भाजप-शिवसेना युती झाली तरी दानवे-खोतकर एकत्र येतील का याकडे जालनेकरांचे लक्ष असणार अाहे. वर्षभरापासून अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी खोतकर यांनी या मतदारसंघाचे दौरे सुरू केले असून या माध्यमातून होणाऱ्या सभा आणि मेळाव्यांतून त्यांनी रावसाहेब दानवे यांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत अर्जुनच दानवाचा वध करेल अशा शब्दात खोतकर यांनी दानवे यांच्यावर शरसंधान साधले होते. त्याला दानवे यांनीही त्याच शब्दात प्रत्युत्तर देताना निवडणुकीत ज्याच्या हातात धनुष्यबाण असणार नाही त्याने ही भाषा करू नये असे म्हटले होते. ‘मातोश्री’ वरील अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत दानवे सहभागी झाले नाहीत. खोतकर यांच्या तक्रारीवरूनच दानवे यांना मातोश्रीपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात होते. दानवे यांनी याचा इन्कार केला हाेता. 

 

दानवे यांच्यावरील आरोप  

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी रामेश्वर सहकारी साखर कारखान्यात गैरप्रकार केल्याचा आरोप मंत्री खोतकर यांनी केला. सिपोरा येथे असलेल्या या कारखान्याचा कारभार गेल्या अनेक वर्षापासून दानवे यांच्याकडे आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील रस्ते, सिंचनाच्या कामात प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या फर्म ची भागीदारी असल्याचा आरोपही खोतकर यांनी केला आहे. शालेय व स्वस्त धान्य पुरवठ्याच्या वितरणाचे काम दानवे यांच्या संस्थेकडेच असून त्यातून त्यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे. प्रत्यक्षात या संस्थांशी दानवे यांचा काहीच संबंध नसल्याचा दावा दानवे यांच्याकडून केला जातो आहे. त्याशिवाय मर्जीतील अधिकाऱ्यांना जिल्ह्यात आणून दानवे त्यांना आपल्या खासगी नोकरांसारखी वागणूक देत आहेत. याच अधिकाऱ्यांवर दबाव आणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक तक्रारी करून त्यांना मनस्ताप देत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे.  

 

खोतकर यांच्यावरील आरोप 

अर्जुन खोतकर यांनी रामनगर  साखर कारखाना व जालना बाजार समितीत गैरव्यवहार केल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. रामनगर सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला. औरंगाबाद येथील तापडिया यांनी तो कारखाना लिलावातून मिळवला. तापडिया यांच्याकडून औरंगाबाद येथील उद्योजक मुळे व मंत्री खोतकर यांनी हा कारखाना विकत घेतला. मात्र यात कारखान्याच्या जमिनी व्यतिरिक्तची  जमीनही विक्री करण्यात आल्याने हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. वर्षभरापूर्वी आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन खोतकर यांच्यावर जालना बाजार समितीच्या गाळे लिलावात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन याची चौकशी करण्याची मागणी केली होती.  

 

पुढील स्लाईडवर पहा, दाेघांमधील शाब्दिक युद्ध.....

 

 

 

बातम्या आणखी आहेत...