आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसी एजंटाचा हिंगोलीत आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - वसमत तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील केबीसी एजंटाने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज दुपारी तीनच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने या घटनेतून सुखरूप बचावला आहे. हिंगोली शहर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

दत्‍तराव नारायण चव्हाण, (वय 55 वर्षे, रा. ब्राह्मणगाव ता. वसमत) असे सदर एजंटाचे नाव आहे. 

 

चव्हाण याने केबीसी या कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यासाठी आणि चार पट रक्कम काही महिन्यांमध्येच मिळवून देण्यासाठी वसमत तालुक्यातील अनेक जणांकडून रक्कम घेतली होती. परंतु केबीसी कंपनी बंद पडून संचालकांवर गुन्हे दाखल झाले असल्याने गुंतवणूकदारांनी दत्‍तराव चव्हाण याच्याकडे दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे वैतागलेल्या दत्तराव याने रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर येऊन, मी कोणाचेही पैसे देऊ शकत नाही, मी पण या केबीसीमुळे बरबाद झालो असे म्हणून अंगावर पेट्रोलची बाटली ओतली. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले. त्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंग चंदेल व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.  

बातम्या आणखी आहेत...