आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेचे अपहरण; 24 तासांत आराेपी पकडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- ओळखीचा फायदा घेऊन शेवगा येथील आठवर्षीय चिमुकलीला पळवून नेणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोवीस तासांत गजाआड केले. संजय बैला पवार (३०, रा. शेवगा, ता. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.  


संजय  याने  येथील आठवर्षीय अल्पवयीन मुलीला बिस्किटचा पुडा देऊन शनिवारी गावातून पळवून नेले. मुलीच्या आई-वडिलांनी शनिवारी   रात्रभर मुलीचा गावात शोध घेतला, परंतु मुलगी सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने रविवारी सकाळी करमाड पोलिस ठाण्यात येऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी शेवगा येथे भेट देऊन मुलगी ज्या ठिकाणाहून गायब झाली त्या किराणा दुकानदार व उपस्थित लोकांची चौकशी केली असता संजय पवारचे नाव समोर आले. तेथून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शेवगा येथील डोंगराकडे आपला मोर्चा वळवला. तेथून कोनेवाडी, दरेगाव डोंगराच्या आसपास शोध घेतला असता संजय  त्या मुलीला सोबत घेऊन दरेगाव डोंगरावर दुपारी दीडच्या सुमारास एका झाडाखाली बसलेला दिसला. पोलिसांनी  पाठलाग करून  संजय व मुलीला ताब्यात घेतले.

 

अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजयविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक बी. पी. कोळी यांच्या मार्गदर्शनात फौजदार प्रदीप भिवसने, जमादार रवींद्र साळवे, श्रीमंत भालेराव, राहुल मोहतमल, नागनाथ केंद्रे, सचिन राठोड करत आहेत.

 

वैद्यकीय तपासणी  होणार

संजय पवारने मुलीला पळवून नेल्याचे कबूल केले. त्याने मुलीशी काही दुष्कृत्य केले काय, हे वैद्यकीय तपासणीनंतर कळेल, असे पोलिसांनी सांगितले.  आरोपीला पकडण्यासाठी शेवगा येथील ग्रामस्थ रफिक मिर्झा, कैलास सुलाने, अन्सार बेग मिर्झा यांनी मदत केली.

 

बातम्या आणखी आहेत...