आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर येथील कोचिंग क्लासेसच्या शिस्तीचा मुद्दा विधानसभेत मांडणार : आमदार देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. लातूरमधील बेशिस्त कोचिंग क्लासेसना शिस्त लावण्याची गरज आहे. हा मुद्दा आपण विधानसभेत मांडणार आहोत, असे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. 


कोचिंग क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर आ. देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, चव्हाण यांच्या हत्येच्या तिसऱ्या दिवशीही लातूर शहरातील सर्व कोचिंग क्लासेस बंद होते. 


आ. देशमुख म्हणाले की लातूर हे एक सुसंस्कृत आणि शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत लातूरमध्ये कोचिंग क्लासेस फोफावले. त्यात काही अपप्रवृत्ती शिरल्या. मोठे अार्थिक व्यवहार होऊ लागल्यामुळे बाउन्सर घेऊन क्लास चालक वावरतात. त्यातच आता अविनाश चव्हाण यांचा खून झाला. लातूरसाठी हे चांगले नाही. राज्य सरकारने खासगी ट्यूशन क्लासेसबद्दल कायदा करणे गरजेचे आहे. खासगी शाळांना नियम आहेत, चित्रपटगृहांना नियम आहेत अन् कोचिंग क्लासेसला मात्र नियम नाहीत, हे चांगले लक्षण नाही. उद्योग भवन परिसरातील पोलिस चौकी बंद आहे. 


दामिनी पथक कार्यरत नाही. क्लासमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा देण्याची गरज आहे. हत्येच्या प्रकारामुळे लातूरमधील क्लासेस चार दिवसांपासून बंद आहेत. प्रशासनातील एकही व्यक्ती तिकडे फिरकला नाही, असे आ. अमित देशमुख म्हणाले. लातूरमधील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गेल्या ५ ते ६ महिन्यांत १३ खून, २० हाफ मर्डर, १६ बलात्कार, ६ दरोडे आणि २३० चोरीच्या घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री या नात्याने लातूरकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा मुद्दा येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगून पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून याकामी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही देशमुख यांनी केली. 


आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी 
चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने तीन जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात करण गहेरवार ,चंदनकुमार शर्मा,शरद घुमे,महेशचंद्र गोगडे पाटील रेड्डी व अक्षय शेंडगे या पाच जणांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी केली. ती मंजूर करण्यात आली. 


बीडमधून शेजारी जिल्ह्यांमध्ये होतोय गावठी कट्ट्यांचा पुरवठा 
बीड जिल्ह्यातून शेजारील जिल्ह्यांमध्ये अवैध गावठी कट्ट्याचा पुरवठा होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लातूर येथील कोचिंग क्लास चालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येसाठी परळीतील व्यक्तीच्या मदतीने गावठी कट्टा उपलब्ध करण्यात आला तर तिकडे नगरमध्ये जाऊन गावठी कट्ट्याची विक्री करणाऱ्या गेवराई येथील एकाच्या नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यापूर्वीही नगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते तर बीड पोलिसांनी गत आठवड्यातच एक जण ताब्यात घेतला होता. 


लातूर येथील स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तपासात शार्प शुटरने परळीतील व्यक्तीच्या मदतीने बिहारमधून गावठी कट्टा उपलब्ध करून देण्यात आला होता व अंबाजोगाईच्या वाघाळा शिवारात ट्रायलही घेण्यात आली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. लातूरच्या घटनेतील ही माहिती समोर येत होती ताेच तिकडे अहमदनगरमध्येही गावठी कट्टा विक्री करण्यासाठी गेलेल्या नितीन जाधव या गेवराई येथील तरुणाला नगर पोलिसांनी तारकपूरमधून अटक केली आहे. 


लातूरमधील क्लासेस बंद 
चव्हाण यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशी कोचिंग क्लासेस बंद राहिले. शैक्षणिक क्षेत्रातील तणाव हळूहळू निवळत अाहे. गुरुवारपासून क्लासेस सुरळीत होतील. चव्हाण यांचा रविवारी मध्यरात्री खून झाला होता. तो क्लास चालकांतील स्पर्धेतून झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. चव्हाण आणि त्यांचे व्यवसायातील जुने सहकारी यांच्यातील आर्थिक व्यवहारातून झाल्याचे पुढे आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...