आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित मातृत्व : 18 जिल्ह्यांत खासगी स्त्रीरोग तज्ञांची पाठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - माता आणि बालमृत्यूंचा दर कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियानाकडे राज्यातील खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी पाठ फिरवली आहे. तब्बल १८ जिल्ह्यांत एकाही खासगी स्त्री रोग तज्ज्ञाने शासनाला मदत केली नसल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.  दरम्यान, ६१ स्त्री रोग तज्ज्ञांच्या सेवेमुळे बीड राज्यात अव्वल स्थानी आहे.   


देशातील माता आणि बालमृत्यूचा दर कमी करण्यासाठी नाेव्हेंबर २०१६ मध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केेंद्रांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांची संख्या कमी असल्याने खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्वयंसेवक म्हण्ून प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये मोफत सेवा देत गर्भवती मातांची तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते. तज्ज्ञांमार्फत प्रसूतीपूर्व तपासणी होऊन उपचार, देखभालीच्या सूचना गर्भवतींना मिळाल्यास प्रसूतीदरम्यान होणारा माता आणि बालमृत्यूंचा दर कमी व्हावा हा उद्देश होता. मात्र, राज्यात खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी या अभियानाकडे पाठ फिरवल्याचे आरोग्य विभागाने १० जानेवारी २०१८ रोजी दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. 

 

या जिल्ह्यांनी फिरवली पाठ

 नाशिक, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, परभणी, अकोला, नांदेेड, सांगली, मुंबई, बृहन्मुंबई, बुलढाणा, वाशीम, गडचिरोली, हिंगोली, धुळे, रत्नागिरी, नंदुरबार या अठरा जिल्ह्यांत एकही खासगी स्त्रीरोग तज्ज्ञ सहभागी झालेला नाही.  

 

लय टिकवून ठेवू   
चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात हे अभियान राबवले गेले आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मोठी मदत झाली. यापुढेही ही रुग्ण तपासणीची ही लय कायम टिकवून ठेवून राज्यात अव्वल राहण्याचा प्रयत्न करण्यात येईल.   
- डाॅ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

 

दोन महिन्यांत बीड अव्वल  
दोन महिन्यांपूर्वी बीडही या उपक्रमात मागे होते. मात्र, नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांनी खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ८१ खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली. यापैकी ६१ जणांनी नियमित सेवा दिली. ५४७ तास सेवा त्यांनी दिल्यामुळे बीड राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. 

बातम्या आणखी आहेत...