आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाईग्रस्त खुलताबादमध्‍ये वाहतोय माणुसकीचा झरा! केला जातोय मोफत पाणी पुरवठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन दिवसांपासून खुलताबाद शहरात मोफत पाणी वाटप होत आहे. टँकरचे पाणी भरण्यासाठी रांगेत लागलेल्या महिला. - Divya Marathi
तीन दिवसांपासून खुलताबाद शहरात मोफत पाणी वाटप होत आहे. टँकरचे पाणी भरण्यासाठी रांगेत लागलेल्या महिला.

खुलताबाद - येसगाव धरण उन्हाळ्यापूर्वीच आटल्यामुळे खुलताबाद शहरातील लहानग्यांपासून ते वयोवृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत अाहे. याचा पाठपुरावा ‘दिव्य मराठी’ने केल्यानंतर आता या तहानलेल्या खुलताबादवासीयांसाठी दानशूर व्यक्तींसह औरंगाबाद शहरातील डिलर असोसिएशन व मराठवाडा टँकर युनियनच्या वतीने मोफत पाणी पुरवले जात आहे.  


औरंगाबाद शहरातील डिलर असोसिएशन आणि टँकर युनियनने दुसऱ्या दिवशीही शहराला हजारो लिटर मोफत पाणी पुरवले.  रविवारीसुद्धा दिवसभर टँकरच्या खेपा सुरू असणार आहेत. शहराच्या काही भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी धावपळ सध्या तरी थांबली असून उर्वरित शहरालाही टँकर युनियनच्या वतीने लवकरच पाणी पुरवले जात आहे.  १२ ते १५ दिवसाआड पाणी मिळत असल्याने शहरवासीयांचे पाण्यासाठी होत असलेले हाल दिव्य मराठीतून मांडले होते. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बारगळ यांनी शहराला दोन टँकरद्वारे मोफत पाणी पुरवले.


याची बातमी दिव्य मराठीने प्रसारित केल्यानंतर औरंगाबाद डिलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद बलदवा, संजय जाधव,  उमेश अग्रवाल व मराठवाडा टँकर युनियनचे जिल्हाध्यक्ष मिर्झा फेरोज बेग, बब्बू शेर यांनी १ मार्चपासून शहरातील  साळीवाडा, लहानीआळी, फकिरवाडा आदी भागात भागात  तीन टँकरद्वारे  १ लाख लिटर मोफत पाणी पुरवले. प्रशासनाकडून टँकर सुरू होत नाहीत तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येईल, असे आश्वासन  टँकर युनियनने दिले आहे. ३ मार्च रोजीपासून औरंगाबादेतून पाण्याचे ३ टँकर भरून आणले होते, ते आजही सुरू आहेत.

 

पाच विहिरी अधिग्रहणाचे आदेश  
औरंगाबाद शहरातून पाणी आणण्यासाठी  वेळ वाया जाऊ नये, त्यामुळे खुलताबाद परिसरातूनच टँकरला पाणी भरून मिळावे, यासाठी नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन,  सुरेश मरकड, मुख्याधिकारी ज्योती पाटील यांनी तहसीलदारांशी चर्चा करून परिसरातील विहिरी अधिग्रहण करून युनियनच्या टँकरला पाणी पुरवण्याचे पत्र दिले.  तहसीलदार अरुण जऱ्हाडांच्या आदेशावरून ना. तहसीलदार अशोक कापसेंनी ५ विहिरी अधिग्रहण केल्याचे शासकीय पत्र काढले.

 

पालिकेकडून सत्कार  
मोफत पाणी पुरवणारे डिलर असोसिएशन व टँकर युनियनचे पदाधिकारी शिवप्रसाद बलदवा, रमेश अग्रवाल, मिर्झा फिरोज बेग, बब्बू शेर, मुन्नाभाई, अन्वर मिर्झा बेग, सय्यद यासर, शेख शकील आदींचा सत्कार नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी ज्योती पाटील, नगराध्यक्ष अॅड. कमर, उपनगराध्यक्ष मरकड, पाणीपुरवठा सभापती सईदाबेगम, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, मुनिबोद्दीन मुजिबोद्दीन आदींनी केला.

 

आणखी संघटना सरसावल्या  
टँकर युनियन शहरालामोफत पाणीपुरवठा करत असल्याने प्रेरित होऊन गंगापूरचे माजी नगराध्यक्ष तथा डिलर असोसिएशनचे कोशाध्यक्ष संजय जाधव यांनीही खुलताबादला त्यांच्या टँकरने मोफत पाणी पुरवण्यात येईल, असे कळवले. डिलर असोसिएशनचे सचिव अजित राणा यांनीही मोफत  पाणी पुरवणाऱ्या टँकरला मोफत डिझल व इतर खर्च देण्याचे कबूल केले. अशा अनेक संघटना दिव्य मराठीने घेतलेल्या पुढाकाराने मोफत पाणी पुरवत आहे.

 

नगरपालिकेने दिला रास्ता रोकोचा इशारा

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरात ७ दिवसांत टँकर सुरू करावे, अन्यथा रस्ता रोकोचा इशारा  नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर,  अॅड. कैसरोद्दीन, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक मुनिबोद्दीन, रुख्मणबाई फुलारे, सईदा बेगम, अविनाश कुलकर्णी आदी नगरसेवकांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...