आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अॅप, ऑनलाइन लिंकवरून क्रिकेटवर सट्टा; 4 जण पोलिसांच्या ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - सार्वजनिक ठिकाणी मोबाइलमधील अॅपव्दारे ऑनलाइन लिंकवर आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर जालन्यात सट्टा लावला जात होता.  याबाबत विशेष कृती दलाला माहिती मिळताच पथकाने एका हाॅटेलमध्ये धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले. मात्र सट्टेबाज बुकी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या ऑनलाइन सट्टेबाजीची सर्व सूत्रे गोवो येथून हलवली जात होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.  


पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सट्टेबाजीवर  कारवाया करण्याच्या सूचना केल्या आहेत.  उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख यांना  सट्टेबाजांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांना मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावर बेटिंग  सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने बाबूराव काळे चौकातील दि ग्रेट मंमादेवी हॉटेलमध्ये छापा टाकून अमित हिरालाल रठ्ठैय्ये (२७, कपडा बाजार, जालना), विनोद दादुराम रठ्ठैय्ये (४२, आदित्य कॉम्प्लेक्स, बडी सडक, जालना), शेख नजीर शेख इब्राहिम (४३, खडकपुरा, जालना), रूपेश गणेश घोडके (३२, लालबाग) हे चार जण टीव्ही पाहून सट्टा खेळताना  आढळून आले. त्यांच्याकडे महागडे मोबाइल व नगदी रक्कम असा एकूण १ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.  अमित   रठ्ठैय्ये हा मुख्य बुकींसोबत सट्टेबाजी करीत असल्याचे आढळले. तो स्वत:चा मोबाइलवरून स्वत:च्या व बुकीच्या आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मोबाइलमध्ये अॅपचा वापर करून त्याद्वारे ऑनलाइन लिंक तयार करून आयपीएलमधील  क्रिकेट सामन्यावर बेटिंग करत असताना आढळून आला.


या प्रकरणी कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव राऊत हे करीत आहेत.  मुख्य सट्टेबाज सोनू चौधरी, विनोद भगत, सूरज काबलिये हे फरार आहेत. ही कारवाई विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक जाधव, पीआय महादेव राऊत, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, शिवाजी जमधडे, मनोज काळे, कैलास खार्डे, संदीप बोंद्रे, संतोष पवार, सुधीर वाघमारे, फुलचंद्र गव्हाणे, किरण चेके, देविदास भोजने, श्रीकुमार आडेप यांनी केली आहे.

 

सट्टेबाजीसाठी घेत होते यू ट्यूबवरून प्रशिक्षण
अॅपवरून ऑनलाइन बोली लावल्यानंतर दहा पट जास्त पैसे मिळायचे. ही बोली खेळण्यासाठी अनेकांनी यूट्यूबवरून प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. या टेलिग्रामवरील या चॅनेलमुळे अजून बुकी समोर येण्याची माहिती पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

 

३ हजार रुपये भरून सदस्यत्व  
सट्टेबाजांकडून पाठवण्यात आलेल्या लिंकवर माहिती भरून ३ हजार रुपयांमध्ये सदस्यत्व मिळत होते. यानंतर लॉग इन आयडी तयार होऊन टॉस, खेळाडू, रन, अाऊट होणे, खेळाडूचे रन आदींवर बोली लावली जात होती. यात ५ हजारांची बोली लावल्यास बोलीत ५ हजाराला ७ हजार ५०० तर १० हजाराला ५ हजार वाढवून दिले जात होते, असे पोलिसांनी सांगितले.

 

पुढे काय?

जालन्यात मिळालेली वेब लिंक ही मुंबई येथून तयार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या लिंकवर जालन्यातून किती जण  सदस्य झाले, याबाबतचा तपास सुरू असून अजूनही अनेक सटोडे पोलिसांच्या रडावर येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...