आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला देशाच्या नावाने बोलावले जाणार हाच गर्वाचा क्षण- मिस्‍टर इंडिया दारासिंग खुराणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - ‘मिस्टर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मे मुझे मेरे नामसे बुलाया नही जायेगा, ताकि   देश के नाम से बुलायेंगे. यही सबसे गर्व ही बात रहेगी’ असे उद्गार आहेत येथील मिस्टर इंडिया ठरलेला व आता मिस्टर इंटरनॅशनलसाठी म्यानमारला २० एप्रिल रोजी रवाना होत असलेल्या दारासिंग राकेश खुराणा याचे. देशाचा इतिहास, प्राचीन संस्कृती, येथील किल्ल्यांचा इतिहास, वास्तुशास्त्र यापासून ते देशातील सर्वसामान्य माणसांचे राहणीमान यांचे समग्र जगाला दर्शन घडवण्याचे काम मिस्टर इंटरनॅशनल स्पर्धेतून आपण करू, असा विश्वासही दारसिंग याने व्यक्त केला.


परभणीतील उद्योजक व पंजाब हॅन्डलुमचे संचालक असलेले राकेश खुराणा यांचे चिरंजीव दारासिंग हा सहा महिन्यांपूर्वी मिस्टर इंडिया ठरला आहे. शालेय जीवनापासूनच मॉडेलिंगची वेगळीवाट चोखळताना त्याची सुरुवात परभणीतूनच झाली. येथील क्विन्स इंग्लिश स्कुलच्या मिस्टर परभणी स्पर्धेतून पुढे आलेल्या दारासिंगने दहावीनंतर मुंबईचा रस्ता धरला.


वाणिज्य शाखेची पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेताना मॉडेलिंगमध्ये त्याने नाव कमावण्यास सुरुवात केली. अतिशय देखणा व उंचपुरा असलेल्या दारासिंगला त्यांच्या मोठ्या मेहनतीतून या क्षेत्रात यश मिळण्यास सुरुवात झाली. सहा महिन्यांपूर्वीच तो मिस्टर इंडिया ठरला होता. त्यावेळी त्याची जन्मभूमी असलेल्या या शहरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मिस्टर इंटरनॅशनल स्पर्धा येत्या २३ एप्रिलपासून म्यानमारमध्ये होणार आहे. त्यासाठी तो २० एप्रिलला रवाना होणार आहे. या स्पर्धेत ४० देशांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी सहभागी होणार आहे.


भारताच्या वतीने दारासिंग प्रतिनिधित्व करील.  त्याबाबत तो म्हणाला, स्पर्धेत माझ्या नावाचा उल्लेख होणार नाही तर इंडिया या नावानेच मला स्टेजवर बोलावले जाईल, हीच मोठी अभिमानाची बाब माझ्यासाठी आहे.

 

स्पर्धेची खास तयारी
स्पर्धेच्या तयारी बाबत तो म्हणाला, राजस्थानमध्ये प्रामुख्याने जयपूर व अन्य शहरांतून या स्पर्धेसाठी फोटोशूट व शूटिंग करण्यात आले आहे. भारतातील पुरातन किल्ले, त्यांचे वास्तुशास्त्र यासह ग्रामीण संस्कृती या स्पर्धेत दर्शवण्यासाठी फोटोसेशन करण्यात आले. फोर्टस् ऑफ इंडिया व स्ट्रीटस् ऑफ इंडिया या नावांनी लघुपटही तयार करण्यात आले आहेत. ते या स्पर्धेत दाखवले जाणार आहेत. अन्य देशांसाठी ही बाब आकर्षणाची निश्चित ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत या स्पर्धेसाठी लागणारी तयारी मागील सहा महिन्यांपासून मोठ्या मेहनतीसह करण्यात आल्याचेही दारासिंग  याने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.  

 

ब्लड कॅन्सरसाठी ब्रँड अॅम्बेसेडर
ब्लड कॅन्सर या असाध्य आजारासाठी काम करणाऱ्या दात्री या संस्थेसाठी दारासिंग खुराणा हा भारताचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करीत आहे. त्यासाठी तो सध्या देशभर भ्रमंती करीत असून यातून ब्लड कॅन्सरवर जनजागृती करण्याचे काम तो करीत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...