आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वादावादीनंतर मायलेकींचा विषाने मृत्यू; गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील एका कुटुंबातील मायलेकींचा कौटुंबिक वादातून विष पिल्याने मृत्यू झाला तर तीन वर्षीय मुलावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकारात विष दिले गेले की आईने दोन मुलांसह विष प्राशन केले, याबाबत खात्रीलायक माहिती समोर येऊ शकली नाही. मंगळवारी (दि.२३) सायंकाळपर्यंत याप्रकरणी सोनपेठ पोलिसांत गुन्हाही दाखल झालेला नव्हता.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहंडुळ (ता.सोनपेठ) येथील पद्मजा हिचा विवाह गौंडगाव (ता.गंगाखेड) येथील भगवान कऱ्हाळे याच्यासोबत झाला होता. दोघेही नात्यातीलच आहेत. त्यांना संध्या (६) व अगस्थी(३) अशी दोन मुले असून सोमवारी (दि.२२) रात्री दहाच्या सुमारास घरातील कौटुंबिक वादानंतर पद्मजा व तिची दोन्ही मुले विष प्राशन झाल्याने गंभीर झाली. त्यांना पती भगवान कऱ्हाळे याने गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने तिघांनाही अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी पद्मजाच्या माहेरची मंडळी व सासरची मंडळी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि.२३) सकाळी अकराच्या सुमारास पद्मजा व मुलगी संध्या हिचा मृत्यू झाला. मुलगा अगस्थी याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

रुग्णालयात वाद
कौटुंबिक वादाचे पडसाद रुग्णालयातही दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर मूळ गावी गौंडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  या प्रकारात पद्मजा हिच्या माहेरच्या मंडळींनी भगवान कऱ्हाळे व त्याच्या आईवडिलांशी वाद घातल्याने तणावपूर्ण परिस्थितीनंतर भगवान कऱ्हाळे हा अंत्यसंस्कारास हजर नव्हता तर त्याच्या आईवडिलांना पोलिसांनी सुरक्षेसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले.


विष प्याले की पाजले
या प्रकरणातील विष प्रयोगाचा प्रकार हा आई पद्मजा हिने स्वत:सह मुलांवर करून घेतला की त्यांना विष देण्यात आले, ही बाब समोर येऊ शकली नाही. याप्रकरणी फिर्यादही दाखल झाली नसल्याने पोलिसांनीही याबाबत निश्चित काही सांगण्यास असमर्थता दर्शवली. सोनपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोपान सिरसाट अधिक तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...