आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघींना बुडताना पाहून वाचवले, इतर दोघींना वाचवता आले नसल्याची खंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मित्रांसोबत दररोज पोहायला जात होतो. नदीत बुडणाऱ्या मुलींना पाहून जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली अन् त्यांना सुखरूप बाहेर काढले. पण आणखी काही मिनिटे आधी तेथे पोहोचलो असतो तर इतर दोन मुलींनाही वाचवता आले असते याची खंत नेहमी बोचत राहील, असे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डीच्या नदाफ एजाज अब्दुल रऊफ या विद्यार्थ्याने म्हटले. एजाजला २०१७ चा राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव आहे. लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


दहावी वर्गातील एजाज गरीब कुटुंबातील आहे. त्याचे आई-वडील व मोठा भाऊ शेतात मजुरी करतात. गरजा भागत नसल्याने वडिलांना होमगार्डचे काम करावे लागते. शौर्याबद्दल नदाफ म्हणाला, मला पुरस्कार मिळावा म्हणून मी हे काम केले नाही, तर कपडे धुताना नदीत पडलेल्या मुलींना वाचवण्याच्या भावनेतून नदीत उडी घेतली. ३० एप्रिलचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे उभे राहतात.  

 

नदाफ एजाजला पुरस्कार जाहीर झाल्यामुळे पार्डीचे ग्रामस्थही आनंद व्यक्त करत आहेत. तो शिकत असलेल्या राजाबाई हायस्कूलनेही त्याचा गौरव केला आहे.


तिघांना मरणोत्तर पुरस्कार
देशातील १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. यात ३ बालकांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. पुरस्कारप्राप्त बालकांत ७ मुली व ११ मुलांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारीला त्यांना गौरवण्यात येईल. चार श्रेणीत देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

 

मजुरी करून मुलाला शिकवणार
मोठ्या मुलाला शिकवण्याची इच्छा होती. मात्र, त्याला शिक्षण दिले नाही. आता एजाजला शिकवून मोठे करणार असल्याची भावना त्याची आई शमीम बेगम यांची आहे. मजुरी करून मी त्याला शिकवणार आहे, त्याला काहीही कमी पडू देणार नाही, त्याने लष्करात जाऊन देशसेवा करावी, अशी माझी इच्छा असल्याची भावना एजाजच्या आईने व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...