आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना वाघही नाही, शेळीही नाही तर हातपाय आखडणारे कासव;जालना जिल्ह्यात हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद /घनसावंगी- बाळासाहेबांच्या काळात वाघ असणारी शिवसेना आता वाघही राहिली नाही, शेळीही राहिली नाही तर हातपाय आखडणारे कासव बनली आहे. कमळाबाई सेनेचे ३० आमदार फोडण्याची भाषा करते आहे. मात्र शिवसेना त्यावर काहीच न बोलता गुळाला मुंगळे चिटकतात त्याप्रमाणे सत्तेला चिकटून बसली आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी जाफराबाद, घनसावंगी व बदनापूर येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास अजित पवार यांच्यासह जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, चंद्रकांत दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जाफराबाद येथील सभेत पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे मात्र ती फसवी असल्याने किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला हे जाहीर केले जात नसल्याचे पवार म्हणाले. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे,मात्र त्याचा काहीच फरक पडणार नाही. त्यांनी तीन वर्षात शंभर वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. मात्र १५ वर्षानंतर पहिल्यांदाच सत्ता मिळाल्याने ते कशाला सत्ता सोडतील, असा सवाल पवार यांनी केला. शिवसेनेचे ३० अामदार फोडण्याची भाषा भाजप नेते करीत आहेत, त्यावर शिवसेना काहीच बोलत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर एकही आमदार फोडायची भाषा झाली नसती. मात्र बाळासाहेब असताना वाघ असणारी सेना आता शेळी तर राहिलीच नाही मात्र हातपाय आखडणारे व मान आत घालून बसणारे कासव बनली आहे, अशी टीका पवार यांनी केली.

 

लाेणीकर वाळू उपसा मंत्री

जिल्ह्यात आणि विशेषत: अंबड-घनसावंगी परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे पाणीपुरवठा मंत्री आहेत की वाळू उपसा मंत्री आहेत हेच कळत नाही. मंत्री अर्जुन खोतकर यांनी पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी निधीची मागणी केली तरी ते निधी देत नाहीत. मी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाही निधी देऊ शकत नाही तर तुम्हाला कसा निधी देणार, असे उत्तर ते देतात, असे अजित पवार या प्रसंगी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...