आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी नेसले धोतर, असा गाठला घाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - पाथरी तालुक्यातील मुदगल या ठिकाणी अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. प्रत्यक्ष दौरा केल्यानंतर वाहने गायब होत असत. त्यामुळे पाथरीचे तहसीलदार वासुदेव शिंदे यांचे शेतकऱ्याचा वेश परिधान करून सोबत शासकीय वाहन न नेता अत्यंत साध्या पद्धतीने मुदगल गाव गाठून अवैधरीत्या होत असलेल्या वाळू उपशाची पाहणी केली.  


तहसीलदार आले असल्याची माहिती मिळताच वाळूमाफियांनी तत्काळ पळ काढला. यानंतर अवैधरीत्या वाळू उपसा करणारी वाहने आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला. मुदगल येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरीत्या रेती उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी तहसीलदारांकडे प्राप्त झाल्या. याची गांभीर्याने दखल घेत तहसीलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याकरिता पाठवले असता अवैधरीत्या उपसा होऊनही अहवाल मात्र निरंकच येत असे.


स्वत:च निघाले मोहिमेवर
सरकारी कर्मचारी दरवेळी कोणतीही कारवाई करत नसल्याने याचे गौडबंगाल जाणून घेण्यासाठी  तहसीलदार वासुदेव शिंदे शेतकऱ्याची वेशभूषा परिधान करून नदी घाटावर जाण्याचे निश्चित केले. तहसीलदार शिंदे यांनी पॅन्टच्या ऐवजी चक्क धोतर नेसले.  त्यावर खमीस, टोपी आणि खांद्यावर शेला घेऊन ते शासकीय चारचाकी वाहन न घेता दुचाकी वाहनावर निघाले. त्यांनी मुदगल येथील गोदावरी नदी गाठली. तरीही तहसीलदार हे शेतकऱ्यांच्या वेशामध्ये आले आहेत, असे समजताच वाळू उपसा करणारे आणि वाहतूक करणारे क्षणार्धात पसार झाले.  

 

शासकीय कर्मचाऱ्याने खबर दिल्याची शंका
तहसीलदार शिंदे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी निघाल्याची माहिती बहुदा शासकीय कर्मचाऱ्यानेच वाळू माफियांना दिली असल्याची शंका व्यक्त होत आहे. दरम्यान , याबाबत तहसीलदार शिंदे म्हणाले की, कारवाई करण्यासाठी मुदगल या ठिकाणी वेशांतर करून गेलो होतो. काही वाहने तत्काळ फरार झाली. यानंतर अवैधरीत्या वाळू उपसा करणारी वाहने आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. तहसीलदार शिंदे यांच्यासोबत या वेळी मुदगल येथे पोलिस पाटील घोडके  उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...