आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य अस्वस्थ, अस्थिर, असहिष्णुताही वाढली; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अशी आमची मागणी होती. मात्र, सरकारने शेतकऱ्यांसह विविध घटकांतील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मनुवादी वृत्तीच्या लोकांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याने महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सध्या अस्थिर, अस्वस्थ असून राज्यात तसेच देशात असहिष्णुता पसरली असल्याचा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.


तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात जागरण गोंधळ घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला मंगळवारी (दि. १६) सुरुवात करण्यात आली. यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणा जगजितसिंह पाटील, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आदी दिग्गज नेते उपस्थित होते.


माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने साडेतीन वर्षांच्या कालावधीत कोणाचेच भले केले नाही. राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर ३ लाख कोटीवरून ८ लाख कोटींवर गेला. मात्र, सर्वसामान्यांच्या हातात काहीच पडले नाही. बोंडअळीमुळे कापूस हातातून गेला आहे. त्याचे केवळ पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही अनुदान देण्यात आले नाही.  उलट पाऊस पडला असतानाही शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बिल भरण्यासाठी वीजपुरवठा तोडला जात आहे. ऊर्जामंत्री पैसे भरा नाहीतर वीज तोडण्याची दमबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम या शासनाने केले आहे. विदर्भाला अधिक योजना देण्यात येत आहेत. मराठवाड्यावर मात्र, अन्याय केला जात आहे.  अंगणवाडी कर्मचारी, एसटी  कर्मचारी, आदिवासी, विद्यार्थी, व्यापारी अशा सर्वांनाच वेठीस धरण्याचे काम सरकारने केले आहे.

 

इतिहासाप्रमाणे कटकारस्थान
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करून पवार म्हणाले, इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून कटकारस्थान केले. तसाच कारस्थानाचा प्रकार आताही होत आहे.  कोरेगाव भीमा शौर्यदिनी दोन समाजांमध्ये दंगल पेटवण्याचे काम मनुवादी प्रवृत्तींकडून करण्यात आले.

 

गाजर दाखवणारे सरकार
पवार म्हणाले, भाजपला सरकारच चालवता येत नाही. अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाहीत. यामुळे केवळ गाजर दाखवणारेच हे सरकार ठरले आहे.  आता जाईल तिथे भाजपला गाजर तर  शिवसेनेला मुळा दाखवा, असा सल्लाही त्यांनी दिला. सदाभाऊ खोत मंत्रिपद मिळाल्यावर मुंगी होऊन बसले. महादेव जानकर समाजाला विसरून बसले. भाजपप्रमाणेच राज्याच्या अधोगतीला सर्व मित्रपक्ष जबाबदार आहेत, अशी टीकाही पवारांनी केली.