आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद - ‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्य घेऊन उन्नतीचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्था कुरघोडीच्या राजकारणात संपुष्टात निघत आहेत. तेरणा, तुळजाभवानी, बाणगंगा, भाऊसाहेब बिराजदार, नृसिंह या साखर कारखान्यांसह कुलस्वािमनी आणि तेरणा सूतगिरणी, भूम तालुका दूध संघ, धाराशिव कुक्कुटपालन संस्थेनंतर आता उरलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघही मोडीत निघाला आहे. या दूध संघाचे अस्तित्व लवकरच संपुष्टात येणार आहे.
अवसायकांनीही दूध संघ सुधारण्याची चिन्हे नसल्याने पदभार सोडून दिला असून, आता संस्थेची विक्री करून सभासदांची देणी देण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात नवीन विकासाच्या संकल्पना राबवल्या जात नाहीत, नवीन उद्योग येत नाहीत, या वर्षीच्या अर्थसंकल्पातही जिल्ह्याला काहीही मिळाले नाही. त्यामुळे विकास न करणाऱ्या नेत्यांना माफ करा, अशा आशयाने ‘दिव्य मराठी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या विश्लेषणानंतर जिल्हाभर चर्चा झाली.
सुशिक्षित तरुणांनी या विश्लेषणावर “दिव्य मराठी’कडे प्रतिक्रिया नोंदविल्या. बाजूच्या जिल्ह्याचा विकास होत असताना उस्मानाबाद मागे का पडतेय, असा प्रत्येकाला प्रश्न पडला. या प्रश्नामध्ये भर घालणारा आणि विकासाला आणखी एक पाऊल मागे खेचणारा प्रकार समोर आला आहेे. अखेरची घरघर लागलेल्या तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघावर दीड वर्षापासून अवसायक म्हणून एस. आर. नाईकवाडी यांची नेमणूक करण्यात आली. नाईकवाडी यांच्या कामाचा पूर्वानुभव लक्षात घेता ते दूध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी अनेक प्रयत्न करूनही दूध संघाला गतवैभव मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी या पदाचा पदभार सोडला असून आता दूध संघाचे अस्तित्व मोडीत काढून त्याची मालमत्ता विक्री करण्यात येणार आहे.
या प्रमुख संस्थांना लागली घरघर
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना (ढोकी), तेरणा सुतगिरणी (सांजा, ता. उस्मानाबाद), कुलस्वािमनी सुतगिरणी (तुळजापूर), भूम तालुका सहकारी दूध संघ (भूम), नृसिंह सहकारी साखर कारखाना (इंदापूर), बाणगंगा सहकारी साखर कारखाना (जवळा), भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, धाराशिव कुक्कुटपालन सहकारी संस्था (वडगाव), तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघ (उस्मानाबाद).
अशी झाली जिल्हा दूध संघाची दुर्दशा
तुळजाभवानी दूध संघाकडून थकीत देणी तसेच कमी दरामुळे दूध संकलन १०० लिटरही होत नव्हते. तोट्यात गेलेल्या दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनाही दोन वर्षापूर्वी कामावरून काढले.त्यानंतर अवसायकांची नेमणूक केली. अवसायकांनी दूध संघाला गतवैभव देण्याचे प्रयत्न केले. मात्र, भांडवलाअभावी, खासगी दूध संघाच्या स्पर्धेमुळे प्रयत्न फसले.परिणामी त्यांनी पदभार सोडला. आता दूध संघ मोडीत निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.