आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना घरी आला की त्याला खांद्यावर घेऊन मिरवायचंय!राहुलचा धाकटा भाऊ गोकुळची भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शालेय कुस्ती स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर गुरू रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा व अर्जुनवीर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्यासोबत राहुल. - Divya Marathi
शालेय कुस्ती स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर गुरू रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा व अर्जुनवीर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्यासोबत राहुल.

बीड- ‘नाना जिंकला, त्याने देशासाठी सुवर्णपदक मिळवल्याचा अभिमान वाटतो. आजच्या विजयाने कुस्तीतील १५ वर्षांच्या तपश्चर्येला फळ मिळाले. सरावासाठी आई, आबांपासून दूर राहत नानाने(राहुल) ‘कुस्ती एके कुस्ती’ असा कित्ता गिरवला.  नानाच्या झोकून देण्यामुळे आज तो देशाला सुवर्णपदक मिळवून देऊ शकला, भाऊ म्हणून त्याचे मला कौतुक वाटते. तो आला की त्याला खांद्यावर घेऊन मिरवायचे आहे’, अशा शब्दांत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या राहुल आवारेचा धाकटा भाऊ  मल्ल गोकुळ आवारेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात १२-८ अशा फरकाने राहुल आवारेने विजय प्राप्त करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे कुटुंबीयांचा  आनंद गगनात मावत नव्हता. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्याचा भाऊ गोकुळ म्हणाला, ‘या मानाच्या कुस्तीतील विजयाने वडील, आई,  गुरू रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा, अर्जुनवीर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले आहे. रिओ ऑलिम्पिकची संधी हुकल्यानंतर खूप वाईट वाटले होते.  पण नानाने या काळातही मोठा संयम बाळगत नेटाने सराव सुरूच ठेवला होता.  राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीत यश मिळवल्यानंतर नानावरील जबाबदारी वाढली होती. आई, वडील, गुरू, सहकारी मल्ल यांच्यासह तमाम चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे होते.  काही महिन्यांपूर्वीच गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. असे असतानाही केवळ जिद्द, सरावातून नानाने ध्येय साकारलेच. आता नाना आला की त्याची कडकडून मिठी घ्यायची व त्याला डोक्यावर मिरवायचे आहे, अशा भावना गोकुळने व्यक्त केल्या.

 

मोबाइलवर  पाहिले सामने 
गुरुवारी राहुलचे सर्व सामने आबांनी मोबाइलवर पाहिले. त्यातील उत्कंठा, डावपेच व प्रत्येक हालचालीवर आबांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते. उत्कंठा होती, हृदयाची धडधड वाढली होती. पण आत्मविश्वास होता की राहुल जिंकणारच. अन‌् राहुल जिंकल्यानंतर आबांनी ‘हे शाब्बास रे वाघा’ म्हणत जल्लोष केला. ‘ गेल्या तीन दशकांच्या प्रयत्नांना फळ आले. माझे स्वप्न राहुलने पूर्ण केले. आज बोलायला शब्दही सुचत नाहीत. माळवाडीला, पाटोद्याला, बीडला, महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असे काम माझ्या पठ्ठ्यानं केले आहे, अशी भावना बाळासाहेब यांनी व्यक्त केली.

 

मुलांच्या तालमीसाठी बाळासाहेब आवारेंनी गाव सोडले

बाळासाहेब आवारे हे मूळचे माळेवाडीचे (ता.जामखेड, जि.अहमदनगर). त्यांना सर्व आबा या नावाने ओळखतात. व्यवसाय शेती, पण कुस्तीची भारी हौस. अनेक स्पर्धा गाजवल्या. सोयी सुविधांअभावी व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना फार झोकून देता आले नाही.  कुस्तीचे हेच वेड दोन मुले, राहुल आणि गोकुळमध्ये उतरले.  राहुल दुसरीला असताना बाळासाहेबांनी  त्याला चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी माळवाडी सोडून पाटोदा गाठले.  या ठिकाणी सुरुवातीला एका तालमीत प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची तालीम सुरू केली.  

 

‘ आपण जिंकणार आहोतच’
‘राहुलने देशासाठी पदक मिळवावे, ही आमची दोन दशकांपासूनची इच्छा. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर उर अभिमानाने भरून आला होता. कारण राहुलच्या विजयाची खात्री होतीच. तसे ऑस्ट्रेलियाला जाताना त्याच्याशी बोलणे झाले होते.  राहुल म्हणालाच होता, आपण जिंकणार आहोतच. त्याने शब्द खरे केले. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला, खऱ्या अर्थाने कष्टाचे, मेहनतीचे आज चीज झाले.’ असे राहुलचे वडील अन‌् त्याचे पहिले गुरू वस्ताद बाळासाहेब  आवारे यांनी सांगितले. 


माझं मातृत्व धन्य झालं
‘राहुलच्या यशाबद्दल खूप आनंद वाटतोय. खूप कष्ट केले त्याने. त्याचे चीज झाले. १२ वर्षांपासून तो रात्रंदिवस याच पदक मिळवायच्याच स्वप्नाने झटत होता. खूपदा डावलण्यात आले. त्याचे सार्थक झाले.  आता राहुलचा फोन आल्यानंतर त्याला सांगणार आहे, की माझं मातृत्व धन्य झालं.’
- शारदा आवारे, राहुलच्या आई

 

‘कुस्ती’तील राजकारण, शस्त्रक्रियेनंतरही खचला नाही!

 भारतीय कुस्ती महासंघातील राजकारणामुळे सन २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकची संधी हुकली. क्षमता असतानाही माघार घ्यावी लागली. हताशा, ताणतणावाने भरलेला हा 
काळ उलटत नाही, तोच पुढे राष्ट्रकुल स्पर्धा तोंडावर असताना गुडघ्याची दुखापत झाली. यातूनही सावरत राहुलने जिद्द, मेहनतीची पराकाष्ठा करत राष्ट्रकुल २०१८ स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली अन‌् चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या.


सन २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून राहुलने जोरदार तयारी केली होती. राहुलचा भारतीय ऑलिम्पिक संघात समावेश होईल, अशी आशा असताना भारतीय कुस्ती महासंघाने ५७ किलो वजनी गटात राहुलला डावलून हरियाणाच्या संदीप तोमरची निवड केली होती. ही निवड वादग्रस्त ठरली होती. राहुलचे सहकारी, पुणे व राज्यातील मल्लांनी राहुलवरील अन्याय दूर करत त्याला संधी द्यावी, या मागणीसाठी आमदार, खासदारांपासून मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. पण संधी गेली ती गेलीच. मेहनत, सराव झालेला असताना संधी हुकल्याने   राहुल निराश झाला होता. तरीही त्याने मोठ्या संयमाने सावरत  सराव कायम ठेवला. आता राष्ट्रकुल स्पर्धांचे लक्ष्य त्याच्यापुढे होते. पण, दुर्दैवाचा फेरा इथेही होता. याच वर्षी त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. मुंबई येथे अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली.  स्पर्धेत सहभाग होतो की नाही हा प्रश्न होता. पण दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ऑल इंडिया रेल्वे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत त्याने पुन्हा धमाकेदार पुनरागमन केले. 


दोन जानेवारी २०१७ रोजी प्रो रेसलिंग लीगच्या पहिल्याच दिवशी मुंबई महारथी संघाकडून खेळत  हरियाणाच्या संदीप तोमरला धूळ |चारली. याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रवेशासाठी २५ डिसेंबर २०१७ रोजी सोनिपत (हरियाणा) येथील निवड चाचणीत राहुलने रिओ ऑलिम्पिकमधील  सहभागाची संधी ज्याच्यामुळे हुकली त्या पहिलवान संदीप तोमरला चितपट केले. यामुळे राहुलचे राष्ट्रकुल स्पर्धेतील स्थान निश्चित झाले होते.

 

आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे ध्येय
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता सन २०२० मध्ये टाेकियाेतील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचे राहुलचे ध्येय आहे. याबाबत मित्र, सहकारी कुस्तीपटूंशी तो नेहमी बोलत असतो.

 

असा सुरू होता सराव

 काही दिवस बंगळूरु, पुणे  येथे सराव केला. त्यानंतर दिल्ली येथे दररोज आठ तास सराव सुरू केला. साडेतीन महिन्यांपासून तर सरावाचा वेळ वाढवला होता. सकाळी पाच वाजता  नियमित व्यायाम, दुपारी थोडा आराम, पुन्हा चार वाजेपासून जीम, सपाट्या, मॅच प्रॅक्टिस, टेक्निक प्रॅक्टिस या पद्धतीने राहुलने वेळेचे नियोजन केले होते.

बातम्या आणखी आहेत...