आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद- सोशल मीडियातील अफवांच्या स्फोटामुळे धुळे जिल्ह्यात पाच भटक्यांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे राज्यभरातील भटक्यांच्या झोपडीत दहशत निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात गेल्यानंतर संशयाच्या नजरांचा त्यांना सामना करावा लागत आहे. भिक्षुकांना हुसकावून लावण्याचे प्रकारही वाढले आहेत. काहींचे तर भिक्षा मागून गोळा केलेले धान्य फेकून देण्याचा प्रकारही घडला आहे. सुरक्षेसाठी काहींना पालावर रात्रभर जागून पहारा ठेवावा लागत आहे.
सोशल मीडियातील अफवांमुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच भटक्यांना धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे जीव गमवावा लागला आहे. मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच जणांना दगडाने ठेचून मारण्यात आले. भटक्या समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी तेथे गेले होते. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात पालावर राहणाऱ्या भटक्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस विभागाकडून जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वीच जागृती करण्यात आली आहे. मात्र, याकडे अद्यापही कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. मुले पळवणारी टोळी आल्याची सोशल मीडियावर जाणते-अजाणतेपणाने अफवा पसरली जात आहे. यामुळे ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे भटक्या समाजातील लोकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. भटक्या जमातीतील पालावर राहणारे नागरिक मारहाणीच्या भीतीने रात्र जागून काढत आहेत. एक-एक करीत काही जण रात्रीचा पहारा देताना दिसून येत आहेत.
फातिमाबी शेख ग्रामस्थांच्या तावडीत
शहरातील सांजा रोड परिसरात तांबटकरी शेख समाजाची वस्ती आहे. पाल ठोकून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी वास्तव्य केले आहे. तेथील फातिमाबी शेख ही उस्मानाबाद तालुक्यातील एका गावामध्ये गेली असता मुले पळवणारी असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी घेरले. तिची कसून चौकशी झाली. ओळख पटल्याने तिला सोडून देण्यात आले. तुळजापूर येथील एका गल्लीमध्ये याच वस्तीवरील अब्दुलबी शेख साहित्य विक्रीसाठी गेली असता काही महिलांनी तिला अपशब्द वापरून हुसकावून लावले.
नेटिझन्सची जबाबदारी वाढली
सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण कलुषित करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी याचा विधायक उपयोग करणारेही अनेक नेटिझन्स आहेत. आता त्यांची सामाजिक जबाबदारी वाढली आहे. इतक्या अफवा पसरूनही एकही मुल पळवून नेण्याची घटना प्रत्यक्षात समोर आलेली नाही. या संदर्भात गुन्हाही दाखल नाही. यामुळे या अफवाच असल्याचे समोर आले आहे. ही बाब आता नेटिझन्सनी जबाबदारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याची गरज आहे.
धान्य सांडवले
कुडमुड्या जोशी समाजातील राहुल भोळे याला दोन दिवसांपूर्वी एका गावात अशा संशयावरून पकडण्यात आले. त्याने भिक्षुकी करून मिळवलेले सर्व धान्य लोकांनी सांडवून दिले. तसेच लातूर जिल्ह्यातील एका गावात विकास वायकर या भटक्या समाजातील व्यक्तीला अपशब्द वापरत गावातून हुसकावून लावण्यात आले. गणपत वायकरांनाही असाच अनुभव आला. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर सातत्याने असा अनुभव येत अाहे.
भटक्यांचे निवेदन
आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, मृताच्या नातेवाइकांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. निवेदनावर सुनील काळे, विलास पवार आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.