आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात प्रवेशापूर्वी कॉन्स्टेबल ललितने घेतले पायरीचे दर्शन; सहकाऱ्यांनी विचारले कसा आहेस ललित?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- मंगळवारी सकाळी दहा वाजता ललित साळवे कारने नातेवाइकासोबत माजलगाव शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस ठाण्यात शिरण्यापूर्वी त्याने ठाण्याच्या पायरीचे दर्शन घेतले. ठाणे अंमलदार सानप यांची भेट घेतली. रुजू होण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज घेतला. तो लिहिला. ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचारी ललितभोवती गोळा झाले. सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे "कधी आलास ... कधी सुट्टी झाली' अशी विचारपूस केली. अर्ज भरून झाल्यानंतर तो पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या केबिनमध्ये शिरला. कडक सॅल्यूट मारून "जयहिंद सर' म्हणत त्यांच्या हाती रुजू होण्याचा अर्ज दिला. तळेकर यांनी अर्ज वाचून त्यावर स्वाक्षरी केली. तळेकर यांनी पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांना मोबाइलवरून संपर्क करत ललित साळवे आज ठाण्यात रुजू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ललितला बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आले. कर्तव्यावर रुजू होताना त्याच्यावर आनंद झळकत होता. 


लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर प्रथमच ललित साळवे मंगळवारी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात सकाळी अकरा वाजता हजर झाला. रुजू होण्याचा अर्ज दाखल करून तो दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या भेटीला गेला. अधीक्षक श्रीधर यांनी त्याच्या प्रकृतीची चौकशी केली. माजलगाव शहर पोलिस ठाण्यात महिला कर्मचारी म्हणून कार्यरत ललिता साळवे या मागील दीड महिन्यापासून वैद्यकीय रजेवर होत्या. त्यांच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच ललित पुरूष पोलिस शिपाई म्हणून माजलगाव शहर ठाण्यात सकाळी अकरा वाजता रुजू झाला. बुधवारी शहर पोलिस ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ललितने पोलिस ठाण्याच्या पायरीचे दर्शन घेऊनच ठाण्यात प्रवेश घेतला. माजलगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांनी ललितकुमारला रुजू करून घेतले. या वेळी पोलिस ठाण्यात ललितबरोबर त्याचे नातेवाइक भारत बनसोडे, समाधान आव्हाड हे आले होते. रुजू झाल्यानंतर ललित सहकाऱ्यांशी गप्पा मारून दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. अधीक्षक श्रीधर यांनी "कसे आहात. सर्व व्यवस्थित आहे ना? तब्येत कशी आहे? अशी आस्थेवाइकपणे चौकशी केली. 


या घटनेकडे देशाचे लक्ष 
एक महिला म्हणून पोलिस खात्यात भरती झाल्यानंतर, पुन्हा पुरुष म्हणून रुजू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. म्हणूनच या घटनेकडे देशाचे लक्ष लागले होते. आधीची ललिता आणि आताचा ललित याच्या पोलिस खात्याच्या अभिलेखावर स्त्री एेवजी पुरुष व ललिता ऐवजी ललित मधुकर साळवे अशी नोंद करण्यात आली आहे. 


माझ्यासाठी आनंदाचा दिवस 
आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा असून लिंग बदलाची ही लढाई मी नऊ महिन्यांपासून लढत होतो. मला या लढाईत मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक, प्रसिद्धी माध्यमे यांनी खूप मदत केली. पोलिस दलात नवे आयुष्य घेऊन ड्युटी करणार असून हा माझा नवा जन्म असल्याचे मी मानतो. आयुष्यभर चांगले काम करणार असून भविष्यात एमपीएससीची तयारी करून पीएसआय होण्याचे माझे स्वप्न आहे. 
- ललित साळवे, पोलिस शिपाई , माजलगाव 

बातम्या आणखी आहेत...