आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना दडपण्याचा पालकमंत्र्यांचाच प्रयत्न; धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटनेप्रकरणी आम्हाला राजकारण करायचे असते तर घटनेच्या दिवशीच संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती. कारवाई झाल्याशिवाय गेटसमोरून उठलोही नसतो. मात्र घटनास्थळी आम्हाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मनातच ही घटना दडपण्याचा डाव आहे की काय, असा संशय आता निर्माण होत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.   


पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एवढी मोठी घटना घडून चार दिवस उलटल्यानंतरही साधा गुन्हाही दाखल होत नाही. राजकारण करायचे असते तर आम्ही चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती. मात्र तशी मागणी केली नाही. 


या घटनेस जे खरोखरच जबाबदार आहेत त्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशीच आमची मागणी आहे. पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर या मानवनिर्मित चुकीबद्दल कोणाला दोषीही धरायचे नाही का ? ज्यांचे जीव गेले त्यास कोणीच जबाबदार नाही का? असा सवाल उपस्थित करतानाच राजकारण करायचे असते तर कारवाई झाल्याशिवाय गेट सोडले नसते, अशा शब्दांत सुनावले आहे. या घटनेच्या  चौकशीत खोलात गेल्यास बऱ्याच गोष्टी उघड होणार असल्याचेही ते म्हणाले.  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्घटनेतील मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

 

कोणाचे जास्त फोटो छापून आले ते तपासून पाहावे
पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करून, याला रोखा, त्याला रोखा असे पत्र देण्यापेक्षा स्वत:हून घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असते तर त्या मृत आणि जखमी कामगारांबद्दल संस्थेचे प्रमुख म्हणून तुम्हाला आस्था, प्रेम आहे असे वाटले असते, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही फक्त दु:खितांचे सांत्वन करण्यासाठी आलो होतो. हे सांत्वन करताना कोणाचे जास्त फोटो वर्तमानपत्रात छापून आले आहेत हे एकदा स्वत: तपासून पाहावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...