आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाधी वॉटर कप स्पर्धेचा शोषखड्डा खोदला, नंतर चढले बोहल्यावर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर- धारूर तालुक्यात यंदा वाॅटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मोरफळी गावात लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी वऱ्हाडींच्या साक्षीने नव वधू-वरांनी शोषखड्डा खोदला. त्यानंतरच दुपारी विवाह पार पडला. या गावात स्पर्धेत जवळपास साडेतीनशे शोषखड्डे खोदले जाणार आहेत. 

 
तालुक्यातील मोरफळी दोन हजार लोकसंख्येचे गाव असून यंदाच्या वर्षासाठी हिंदी चित्रपट अभिनेता अामिर खान यांच्या पाणी फाउंडेशनने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरले आहे. या गावात आता  ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान वॉटर कप स्पर्धा होणार आहे. मागील आठ दिवसांपूर्वी या गावातील काही व्यक्तींनी केज तालुक्यातील पळसखेडा येथे चार दिवसांचे प्रशिक्षण घेतले आहे. पळसखेडा येथे प्रशिक्षण घेऊन परत आलेल्या ग्रामस्थांनी गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये स्पर्धेबाबत मोठी जनजागृती झाली आहे. स्पर्धेचा भाग म्हणून शोषखड्डे, आगपेटी मुक्त शिवार, माती परीक्षण आदी उपक्रम राबविणे आवश्यक आहे. 


मोरफळीतील अभिमान कोपरेटकर यांची मुलगी पल्लवी हिचा विवाह कळंब तालुक्यातील खडकी येथील माणिक परळकर यांचा मुलगा राहुल यांच्याबरोबर रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास गावात होणार होता.  दुपारचं लग्न असल्याने वधू व वर पक्षाकडील मंडळींनी सकाळपासून लग्नाची जोरदार तयारी सुरू केली होती. लग्नस्थळी वधू पिता, वऱ्हाडी यांची लगीनघाई दिसून येत होती. लग्नातील  थाटाकडे न बघता लग्नापूर्वी पल्लवी व राहुल या वधू-वरांनी गावातील बालासाहेब गडदे यांचा शोषखड्डा खोदूनच लग्न करण्याचे करण्याचे ठरविले. सकाळी १० वाजता चार बाय चारचा खड्डा खोदण्यास सुरुवात करण्यात आली. खड्डा खोदून पूर्ण झाल्यानंतरच गावात लग्न सोहळा पूर्ण करण्यात आला. या वेळी काही वऱ्हाडी मंडळीही सोबत होती. वधू-वरांनी खड्डा खोदल्याने गावात एकच चर्चेचा विषय बनला.दरम्यान,इतरांना आदर्श घेण्यासारखे काम वधू - वरांनी केले आहे, असे  मोरफळी येथील  ग्रामस्थ केशव गडदे यांनी सांगितले.  

 

यंदा ५८ गावांचा स्पर्धेत सहभाग   
धारूर तालुक्यात मागील वर्षी वॉटर कप स्पर्धेत  १३ गावे  सहभागी झाली होती. यामध्ये  जायभायवाडी हे गाव महाराष्ट्रातून दुसरे तर कोळपिंपरी हे गाव तालुक्यात प्रथम आले होते. यंदा तालुक्यात ५८ गावे सहभागी झाली आहेत. ५८ पैकी मोरफळी, अंजनडोह, असोला, आंबेवडगाव यासह अन्य चार गावांनी या स्पर्धेसाठी केज तालुक्यातील पळसखेडा या गावांत चार दिवस प्रशिक्षण घेतले आहे. गावागावात सध्या ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान वॉटर कप स्पर्धा होणार आहे.   

 

शोषखड्ड्याच्या कामास सुरुवात  
मोरफळी गावाने वॉटर कप स्पर्धेमध्ये यंदा सहभाग घेतला आहे. स्पर्धा राबविण्यासंबंधी गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या स्पर्धेमध्ये लोकसंख्येनुसार ३५० शोषखड्डे खोदण्यात येणार आहेत. या खड्ड्याचा शुभारंभ रविवारी वधू-वरांनी केला आहे. याचबरोबर स्वच्छता, आगपेटीमुक्त शिवार व माती परीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  
शेषेराव गडदे, सरपंच, मोरफळी.  

बातम्या आणखी आहेत...