आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी सांगूनही सहानुभूतिपूर्वक विचार नाही, आता मॅटमध्ये जाणार- ललिता साळवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या बीड जिल्हा पोलिस दलातील ललिता साळवे हिचा ‘तो’ होण्यासाठीचा संघर्ष ६ महिन्यांनंतरही सुरुच आहे.मुख्यमंत्र्यांनी सांगूनही गृह खात्याने सहानुभूतिपूर्वक विचार न केल्याने आता मॅटमध्ये दाद मागणार असल्याचे ललिता यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. सप्टेंबर २०१७ मध्ये ललिता यांनी आपल्यात होत असलेल्या पुरुषी बदलांमुळे लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यासाठी खात्याने परवानगी द्यावी म्हणून पोलिस अधीक्षकांकडे अर्ज केला होता. दरम्यान, माध्यमांनी ललिताचा प्रश्न समोर आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललिताच्या बाबतीत सहानुभूतिपूर्वक विचार करावा, असे गृह मंत्रालयाला सांगितले. होते. यानंतर सुरुवातीला शस्त्रक्रियेसाठी परवानगी नाकारलेल्या गृहखात्याने ललिताची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली अन् तिच्यात स्त्रियांमध्ये आवश्यक असलेले अवयवच नसल्याचे समोर आले. दरम्यानच्या काळात ललिताने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 


यावर निकाल देताना न्यायालयाने शस्त्रक्रिया करणे हा तिचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगतानाच हा नोकरीसंदर्भातील विषय असल्याने ललिताने मॅटमध्ये अर्ज करावा असे सांगितले. ललिता म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याने दिलासा मिळाला होता. मात्र,सहा महिन्यानंतरही शस्त्रक्रियेच्या परवानगी बाबत निर्णय झालेला नाही. मी घेतलेली अर्जित रजा आणि वैद्यकीय रजाही संपल्याने मी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहे.


.. ललित म्हणू की ललिता?
आता पुन्हा मी मावलगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाले आहे. वरिष्ठ, सहकारी यांच्याकडून चांगली वागणूक मिळत आहे. शिवाय, आता ललित म्हणू की ललिता असा प्रश्न विचारून ते गंमतही करतात आणि मी सुद्धा काहीही म्हणा असे उत्तरे देते.  इतर महिला सहकारी तू आता मुलींसारखं करते, बघते असा बाेलायचं सोडून करतो, बघतो अस बोलायची सवय लावून घे असा सल्लाही देतात.

 

बदलावा लागेल नियम
ललिता यांना परवानगी देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन पोलिस भरती नियमांतच बदल करावा लागले. यासाठी शासन निर्णय काढावा लागेल त्यामुळे याबाबत गृह खातेच निर्णय घेईल.
-जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड

बातम्या आणखी आहेत...