आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविनाश चव्हाण हत्या प्रकरण: रमेश मुंडेकडून आणखी एक पिस्तूल जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अविनाश चव्हाण - Divya Marathi
अविनाश चव्हाण

केज- लातूरच्या स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या मारेकऱ्यास पिस्तूल पुरवणारा केज येथील रमेश श्रीकांत मुंडे हा सध्या पोलिस कोठडीत असून चौकशीत त्याने आणखी एक पिस्तूल त्याच्या घरी असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याच्या केज येथील घराची झाडाझडती करून दुसरे पिस्तूल जप्त केले आहे. 


अविनाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी चव्हाण यांच्या मारेकऱ्यास अटक केल्यानंतर चौकशीत त्याने केज येथील रमेश श्रीमंत मुंडे या तरुणाकडून पिस्तूल घेतल्याचे सांगितले होते. लातूर येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी मुंडे याला रविवारी रात्री केज शहरातील समर्थ नगर भागातील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. रमेश याने दीड लाख रुपयात हे पिस्तूल पुरवल्याची कबुली दिली होती. 


दरम्यान, मुंडे याला लातूर येथील न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीत मुंडे याला लातूरचे पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव व पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्याकडे आणखी एक पिस्तूल असून ते केज येथील घरी असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर केज व लातूर पोलिसांनी मुंडे याच्या घराची झाडाझडती घेऊन दुसरे पिस्तूल हस्तगत केले आहे . हे पिस्तूल तो कुणाला विकणार होता हे चौकशीत समोर येण्याची शक्यता असून या प्रकरणात अजून काही आरोपी हाती लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...