आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई- लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ पुलासाठी बांधकाम सुरू असलेल्या खोल खड्ड्यात मोटारसायकल कोसळून अकरावीत शिकणारा एक विद्यार्थी जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडला. जखमी विद्यार्थ्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अकरावीची परीक्षा दिलेला पवन मुंजाजी कनले (वय १७, रा. जैन गल्ली, अंबाजोगाई) व त्याचा मित्र ऋषिकेश लक्ष्मण गडदे (वय १७, रा. बोधेगाव, ता. अंबाजोगाई) हे दोघे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अंबाजोगाई शहरातील एका अभ्यासिकेत बसून होते. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ते अभ्यासिकेतून बाहेर पडले. लातूर- अंबाजोगाई रोडवरून जात होते. वाघाळा पाटीजवळ सध्या सुरू पूल उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी खोदण्यात आलेल्या खंदकात या दोघांची दुचाकी कोसळली. या अपघातात पवन कनले या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश गडदे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस घटनेचा तपास करीत अाहेत.
पवनचे वडील परभणी जिल्ह्यात कर्मचारी
दोन्ही विद्यार्थी अभ्यासिकेतून अचानक बाहेर पडून अंबाजोगाई - लातूर रोडवर कशासाठी गेले होते, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मृत पवन कनले याचे वडील परभणी जिल्ह्यात महसूल विभागात कर्मचारी असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.
कोणाचेही लक्ष गेले नाही
पुलाचे काम सुरू असल्याने खंदकाच्या बाजूने कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. रात्री अंधारामुळे खोदकामाचा अंदाज न आल्याने दोन्ही तरुण कच्च्या रस्त्यावरून दुचाकीसह खोल खड्ड्यात पडले. अंधारामुळे या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात आले नाही. बुधवारी पहाटेच्या या मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली असता काही लोक खड्ड्यात उतरले. त्यावेळी पवन कनले याचा जागीच मृत्यू झालेला होता. तर ऋषिकेश हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नागरिकांनी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तातडीने बोलावून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.