आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी: कर्ज व नापिकीला कंटाळून 2 शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - कर्ज व नापिकीच्या कारणावरून जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आपली जीवनयात्रा आज बुधवारी(दि.20) संपवली. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील राम रघुनाथ काकडे तर सेलू तालुक्यातील धामणगाव येथील कृष्ण कारभारी डख असे या दोन शेतक-यांचे नावे आहेत.


पिंपळदरी येथील राम रघुनाथ काकडे(वय 50) यांना मागील चार वर्षात सातत्याने शेतीतील नापिकीला तोंड द्यावे लागत होते. शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी युको बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेड कशी करावी या चिंतेने श्री.काकडे यांना ग्रासले होते. आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत असताना श्री.काकडे यांनी बुधवारी सकाळी सातच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दुस-या घटनेत सेलू तालुक्यातील धामणगाव येथील कृष्ण कारभारी डख (वय36) यांनी बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. घेतलेल्या कर्जाची परतफेड ते करू शकत नव्हते. कारण शेतातून गेल्या तीन वर्षात अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. शेती तोटयात गेल्यामुळे ते कर्जाच्या आणखी बोजाखाली दबले होते. या विवंचनेतच त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सेलू पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार नितीन काशीकर अधिक तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...