आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा पोलिसांवर परळीत हल्ला; चार पोलिस जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- चोरी व फसवणुकीच्या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींच्या अटकेसाठी परळी शहरातील इराणी वस्ती भागात आलेल्या तेलंगणा पाेलिसांच्या पथकावर  आरोपींना बेड्या ठोकताच वस्तीतील इतर नागरिकांनी हल्ला केला. यामध्ये चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीविना कारवाई करणे तेलंगणा पोलिसांच्या अंगलट आले.


तेलंगणा राज्यातील करीमपुरा भागात काही दिवसांपूर्वी चोरी व महिलांना दागिन्यांच्या आमिषाने फसवल्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये दाखल गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले होते. हे चोरटे परळीतील इराणी वस्तीतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार करीमपुरा ठाण्याच्या १२ पोलिसांचे पथक सोमवारी सकाळी परळीत दाखल झाले. इराणी वस्तीत सापळा लावून त्यांनी शिताफीने चार जणांना बेड्या ठाेकल्या. मात्र, यावेळी वस्तीतील स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये बी. गणेश, एम. अशोक, शौकत व परवेज हे चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.


स्थानिक पाोलिसांना डावलले

तेलंगणा पोलिसांनी परळीत कारवाई करताना स्थानिक पोलिसांची मदत घेणे टाळले. साध्या वेशात त्यांनी थेट इराणी वस्तीत सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्यावर हल्ला झाला. यानंतर ही माहिती पोलिस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल आनंद यांनी घटनास्थळी धाव घेतली.  


हातकडीसह आरोपी पसार

दरम्यान, शिताफीने अटक केलेले आरोपी पोलिसांवर हल्ला होताच हातकडीसह फरार झाले. आता पोलिसांना पुन्हा त्यांना शोधावे लागणार आहे. तेलंगणा पोलिसांनी स्थानिक पोलिसांना का डावलले हे कळू
शकले नाही.

 

चौकशी सुरू आहे
तेलंगणा पोलिस आरोपींना पकडण्यास गेले. तेथे काहीतरी वाद झाला. त्यानंतर आम्ही तत्काळ आमचे पोलिस अधिकारी, कर्मचारी पाठवले. अद्याप या प्रकरणाची नोंद झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
- अजित बोऱ्हाडे, अप्पर पोलिस अधीक्षक, 

बातम्या आणखी आहेत...