आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीवर पिसाळलेल्या डुकराचा हल्ला;तरुणांनी डुकराला पिटाळून लावल्यामुळे वाचले प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर महापालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्र्यांबरोबरच डुकरांनीही उच्छाद मांडला आहे.  गुरुवारी एका पिसाळलेल्या डुकराने  अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीवर हल्ला करून तिला फाडून खाण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या किंचाळ्या ऐकून तीन ते चार तरुणांनी डुकराला पिटाळून लावल्यामुळे चिमुरडी बचावली. ती सध्या गंभीर जखमी असून तिच्यावर लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.  


लातूर शहरातील दीपज्योती नगर परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पल्लवी परदेशी नावाची चिमुकली घराबाहेर खेळत होती. तिची आई घरातच स्वयंपाक करीत होती. त्यावेळी मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने ती  बाहेर आली. त्यावेळी एका मोठ्या डुकराने तिच्यावर हल्ला केल्याचे तिच्या लक्षात आले. दुसरीकडे मुलगीही किंचाळत होती. आईचा  आरडाओरडा आणि मुलीच्या किंचाळ्या एेकून शेजारचे दोन ते तीन तरुण तेथे धावले. तोपर्यंत डुकराने मुलीला फाडून खाण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. तेथे आलेल्या तरुणांनी डुकराला हुसकावून लावले. मात्र डुकराच्या तावडीतून सुटलेली चिमुरडी रक्तबंबाळ झाली होती. तरुणांनी तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डुकराने गालाला चावे घेतल्यामुळे मुलीला रेबीज प्रतिबंधक लसी देण्यात आल्या आहेत. अशा रुग्णांना १४ दिवस निगराणीखाली ठेवावे लागते. रेबीजची काही लक्षणे आढळली नाही तरच मुलीच्या जखमांना टाके घालता येतील, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले.  


महापालिका शौचालयांच्या कामातच व्यस्त 
 दरम्यान, लातूर महापालिका केवळ स्वच्छ नागरी अभियान म्हणून शौचालयांचे बांधकाम करण्यात व्यस्त आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मात्र केंद्र सरकारच्या कायद्यानुसार त्यांना मारता येत नाही. आणि शास्त्रोक्त पद्धतीने कुत्र्यांवर निर्बीजीकरण करणारी यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे काहीच न करणे ही भूमिका महापालिकेने स्वीकारली आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या प्रमुखांना दुपारपर्यंत तरी पिसाळलेल्या डुकराने चिमुकलीवर हल्ला केल्याची घटना ठाऊक नव्हती.

 

चार वर्षांच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच  चार वर्षांच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला होता.  त्याने मुलाच्या मांडीचे, नाजूक भागाचे लचके तोडले होते. त्याच्यावरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अलीकडे  श्वानदंशाचे रुग्ण वाढल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...