आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदर माता, बालकांना जीवनसत्त्वे मिळण्यासाठी 3 हजार अंगणवाड्यांत लावणार शेवगा, कढीपत्त्याची झाडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीईओंनी तयार केलेली शेवग्याची रोपे. - Divya Marathi
सीईओंनी तयार केलेली शेवग्याची रोपे.

बीड - शेवगा आणि कढीपत्त्यात असलेली औषधी गुणधर्म आणि पौष्टिक सत्वांमुळे जिल्ह्यातील ३ हजार अंगणवाड्यांमध्ये शेवगा आणि कढीपत्त्याची झाडे लावण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी सीईओ येडगे यांनी स्वत:च्या निवासस्थानी शेवग्याची आठशे रोपे तयार केली आहेत.


गर्भवती   माता आणि बालकांना जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांमधून पोषण आहार देण्यात येतो. शासनाकडून देण्यात येणाऱ्या आहाराचे मेन्यू ठरलेले असतात. मात्र, शेवगा आणि कढीपत्त्यात असलेली पोषणसत्वे व औषधी गुणधर्म पाहता गरोदर मातांच्या व बालकांच्या आहारात शेवगा व कढीपत्ता यायला हवा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांसमोर शेवगा व कढीपत्त्याची झाडे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. जून, जुलैमध्ये ही झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी सीईओ अमोल येडगे यांनी स्वत:च्या निवासस्थानी शेवग्याची ८०० रोपे तयारी केली असून बीड तालुक्यातील अंगणवाड्यांना ही रोपे भेट देण्यात येतील.


या उपक्रमाविषयी येडगे म्हणाले, पोषण आहारात शेवगा व कढीपत्ता आवश्यक आहे. मात्र रोजच तो सहजरीत्या उपलब्ध होईलच असे नाही. अंगणवाडीसमोर ही झाडे असतील तर गर्भवती मातांनाही अंगणवाडीत आल्यानंतर शेवगा व कढीपत्ता घरी घेऊन जाता येईल. मुलांच्या पोषण आहारात तो वापरला जाईल. प्रयोग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असून यासाठी निवासस्थानी ८०० रोपे तयार करण्यास सुरुवात केली. सध्या ही रोपे दोन महिन्यांची असून पाऊस पडल्यानंतर जून अथवा जुलैमध्ये ही रोेपे अंगणवाड्यांना देण्यात येतील.

 

खड्डे खोदून तयार
ज्या अंगणवाडीला स्वत:ची इमारत अाहे अशा ठिकाणी या दोन झाडांव्यतिरिक्त इतर तीन फळझाडे लावण्याच्या सूचना आहेत. सरासरी एका अंगणवाडीत पाच झाडे असतील. अनेक अंगणवाड्यांमध्ये यासाठी खड्डेही खोदून तयार आहेत.

 

कढीपत्त्यांचीही तयार रोपे घेऊ
सीईओंनी ८०० शेवग्याची रोपे तयार केली आहेत. अंगणवाडी कार्यकर्तींनाही शेवग्याची रोपे उपलब्ध करण्यास सांगितले आहे. कढीपत्त्याचीही काही रोपे तयार करण्यात येणार असून काही रोपवाटिकेतून खरेदी करण्यात येतील अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके यांनी दिली.

 

काय आहेत गुणधर्म

शेवग्यामध्ये कॅल्शियमसोबतच जीवनसत्त्व अ आणि ब मुबलक  असते. गरोदर मातांसाठी शेवगा वरदान मानला जातो. बालकांमध्येही कृमी नाशक, पचनक्रिया सुधारणारा आणि डोळ्यांसाठी उपयुक्त मानला जातो. शिवाय अॅनेमियातही रक्तशुद्धीकरणासाठी शेवगा उपयुक्त ठरतो. यात कॅल्शियम सोबत लोह, आयोडीन, फॉस्फरस आदी खनिजद्रव्ये असतात. तर  कढीपत्त्यातही आयरन, फॉलिक अॅसिड ज्यामुळे अॅनेमियापासून संरक्षण मिळते. अ व क जीवनसत्व असल्याने व पदार्थांमध्ये चव देणारा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...