आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक बंदीचा दंड न भरल्यास दंडाची रक्कम मालमत्ता करात लावण्याचा फंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- राज्य शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर करून तीन दिवस उलटले आहेत. दरम्यान, तालुका पातळीवर तयार केलेल्या पथकांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत जालना शहरातील दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु, त्यांनी दंडाची रक्कम भरली नाही. ही रक्कम त्यांच्या मालमत्ता करात समाविष्ट करून पीआर कार्डवर बोजा चढवला जाणार असल्याची माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. 


प्लास्टिक बंदी जाहीर झाल्यानंतरही काही मुजोर व्यापारी याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करून सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. पथकांनी दंड केल्यानंतरही त्याची रक्कम भरता नाहीत. यामुळे पथकांनी कारवाई केल्यानंतर नोटिसा दिल्या जात आहेत. यामुळे अशा व्यापाऱ्यांनी दंड न भरल्यास त्यांच्या मालमत्ता करात ही रक्कम समाविष्ट केली जात आहे. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड रोडवरील धनंजय किराणा, याच मार्गावरील जालना सुपर मार्केटमधील व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली. तर बदनापूर येथे मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या दुकानात पाकिजा कलेक्शन, बिकानेर मिठाई, शेख फेरोज यांचे कटलरी दुकान, ओम किराणा, आशीर्वाद किराणा, कल्याणी आईस्क्रीम पार्लर, रामशाम कापड दुकानांचा समावेश आहे. 


वॉर्डनिहाय तपासणी 
व्यावसायिक, खरेदीदारांनी प्लास्टिकचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जालना शहरात ३० जणांचे ६ पथक नियुक्त करण्यात आले. हे पथक प्रभाग निहाय दररोज वॉर्ड तपासत आहेत. जालना शहरात ३० प्रभागातील ६१ वॉर्डांची तपासणी केली जात आहे. या तपासणी मोहिमेत राज्य सरकारने बंदी केलेल्या सर्व प्लास्टिक वस्तू, थर्माकोलच्या वस्तू आदी साहित्याची कसून तपासणी केली जात आहे. दोषी आढळलेल्या व्यापाऱ्यांना दंडाच्या नोटिसाही बजावल्या जात आहेत. परंतु अनेक व्यापारी दंड देण्यास नकार देत आहेत. 


पालिकेकडून व्यापाऱ्यांना नोटिसा 
प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड करण्यात आला.परंतु त्यांनी दंड न भरल्यामुळे मालमत्ता करात त्यांचा दंड समाविष्ट करण्यात आला आहे. 
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, जालना. 

बातम्या आणखी आहेत...