आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाटा 60, रुग्ण 180 ; प्रस्ताव रखडला, कर्मचारी संख्याही अपुरी, रुग्णांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद -   खाटा ६०, रुग्णांची संख्या १८० च्या जवळपास, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे येथील महिला रुग्णालयच आजारी पडले आहे. सातत्याने खाटा वाढीचा प्रस्ताव पाठवूनही उपयोग होत नसल्यामुळे आरोग्य प्रशासनही हतबल झाले आहे. पाच वर्षांपूर्वी उस्मानाबाद येथे महिला रुग्णालय सुरू करण्यात आले. शहरासह परिसरातील २० ते २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भार या रुग्णालयांवर आहे. येथे या भागातून रोज मोठ्या प्रमाणात प्रसूतीसाठी महिलांना पाठवण्यात येते.

 

महिला रुग्णालयाची उभारणी झाल्यापासून या भागातील महिला रुग्णांची सोय होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार काही अंशी या महिला रुग्णांना दिलासा मिळाला असला तरी सातत्याने हेळसांड सुरूच आहे. आजही काही महिला रुग्णांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. 

 
महिला रुग्णालय सुरू करतानाच जवळपास दोनशे खाटांचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात खाटा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. केवळ ६० खाटांवरच भागवण्यात येत आहे.  यामुळे जिल्ह्यातील महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. बहुतांश वेळी रुग्णालय फुल्ल असेल तर अन्य रुग्णालयात जावे जागत आहे. यासाेबतच कर्मचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे. त्यांना अधिक रुग्ण आल्यानंतर व्यवस्थापन करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खाटा नसल्यामुळे केवळ गाद्या उपलब्ध करून वाॅर्डामध्ये जमिनीवर झोपवून महिलांवर उपचार करावे लागत आहेत. बहुतांश वेळी व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडत आहे.

 

यामुळे सातत्याने वादाचेही प्रसंग निर्माण होत आहेत. कमी खाटा व रुग्ण अधिक अशी परिस्थिती येथे सातत्याने निर्माण होत आहे. गुरुवारीच (दि. १७) येथे १८० महिला रुग्ण दाखल केले होते. अशी परिस्थिती सातत्याने असते. यामुळे रुग्णालयात एका प्रकारच्या तणावाचीही परिस्थिती निर्माण होत आहे.   रुग्णालय प्रशासनाने खाटा वाढीसाठी प्रस्ताव पाठवले आहेत. सुरुवातीला दोन वर्षांपूर्वी १००  खाटांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, आरोग्य संचालक विभागाने येथे प्रस्ताव परत पाठवून २०० खाटांचा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यास सांगितले. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी २०० खाटांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र, अद्यापही त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. केवळ प्रस्ताव दाखल करून घेऊन वरिष्ठ शांत आहेत.

 

या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी प्रशासकीय  व शासनाच्या स्तरावर कोणतीही हालचाल झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील महिला रुग्णांचा त्रास सुरूच आहे. खाटा वाढण्यासाठी या रुग्णालयाला आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न आहे.   

 

कर्मचाऱ्यांचीही संख्या त्या तुलनेत कमी  
रुग्णालयात ६० खाटांच्या तुलनेमध्ये कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यानुसारच आहे त्या कर्मचाऱ्यांवर व्यवस्थापन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ६०  रुग्णांसाठी जितके कर्मचारी आहेत तेवढ्या कर्मचाऱ्यांवर दीडशे ते दोनशे रुग्णांची व्यवस्था करण्याची कसरत करावी लागत आहे. यामुळे कर्मचारी संख्येबरोबरच खाटांची संख्या वाढवण्याची गरज आहे. 

 
आयोगात मूल्यमापन   
अविकसित जिल्ह्यांच्या यादीमध्ये नीती आयोगाने उस्मानाबादचा चौथ्या क्रमांकावर समावेश केला आहे. यामध्ये आरोग्य हा घटक डोळ्यासमोर ठेवून मूल्यमापन केले आहे. आरोग्य विभागाची परिस्थिती चांगली नसल्याचा ठपका ठेवला आहे. असे असूनही आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या महिला रुग्णालयात या मुद्द्याकडे कोणीही पाहण्यास तयार नाहीत.   

 

नवीन इमारतीच्या वापराची प्रतीक्षा   
जिल्हा रुग्णालयाचे कामकाज नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याची प्रतीक्षा महिला रुग्णालयाच्या प्रशासनालाही आहे. कारण जुन्या इमारतीमध्ये महिला रुग्णालय सुरू करून तेथे खाटा वाढवता येऊ शकतील, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप प्रशासनाला यामध्ये यश मिळालेले नाही.   

 

उद्दिष्ट कसे साध्य होणार   
शासनाने सर्वाधिक प्रसूती शासकीय रुग्णालयांमध्ये व्हाव्यात, असा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरी व ग्रामीण आरोग्य प्रशासनाच्या वतीने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रसूतीसाठी सर्वात मोठा आधार असलेले महिला रुग्णालय कमकुवत असेल तर प्रसूतीचे उद्दिष्ट कसे साध्य होणार, हा प्रश्न आहे.   

 

लोकप्रतिनिधी उदासीन   
लोकप्रतिनिधी खाटा वाढवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या मंजुरीत कमी पडत असल्याची स्थिती आहे. लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव वाढवून महिला रुग्णालयाचे सक्षमीकरण करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधीच उदासीन दिसत आहेत. आता पक्षीय भेद विसरून सर्वांनी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.    

 

२०० खाटांचा प्रस्ताव, पाठपुरावा सुरू   
प्रशासनाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच २०० खाटांचा प्रस्ताव मंजूर होऊन त्या पद्धतीने कामकाज सुरू करण्यावर भर आहे.  
-राहुल वाघमारे, रुग्णालय अधीक्षक.

 

 

बातम्या आणखी आहेत...