आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखली केंद्र बंद; गर्भवतीचा खडतर प्रवास, दाभाडीत 4 तासांनंतर प्रसूती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/दाभाडी - ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य, उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित न राहणे, अपडाऊन या समस्येमुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील चिखली येथे माहेरी आलेल्या एका गरोदर मातेस सकाळपासून त्रास होत असल्याने नातेवाइकांनी तिला चिखली येथील आरोग्य उपकेंद्रात नेले.

 

परंतु    तेथील उपकेंद्र बंद होते. तासभर थांबूनही कुणीच न आल्याने खड्डेमय रस्त्याचा प्रवास करून शेवटी दाभाडी येथील प्राथमिक केंद्रात नेण्यात आले. तेथे ती प्रसूत झाली.
जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यापैकी १६ उपकेंद्र आहेत. यातील बहुतांश केंद्रांमध्ये रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. यामुळे आरोग्य विभागाविषयी नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी हे आरोग्य केंद्रांना भेटी देत नाहीत. त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय हाेत असल्याच्या तक्रारींमुळे सभेेचे कामकाज तब्बल तासभर थांबले होते.

 

जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची अशी परिस्थिती असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.   चिखली येथे माहेरी आलेल्या गरोदर मातेला सकाळी ६.३० वाजता येथील उपकेंद्रात प्रसूतीसाठी दाखल केले. परंतु, तेथे कुणीच नव्हते. यामुळे गरोदर मातेला या ठिकाणी त्रास सहन करावा लागला. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना फोन लावून कधी येणार असे विचारले असता, पंधरा मिनिटांत येतो, अर्ध्या तासात येतो, अशी कारणे सांगून तब्बल दीड तास घालवला. यामुळे गरोदर मातेला रस्त्यावरच प्रसव कळा सुरू झाल्या.  

 

दीड तास उलटूनही कर्मचारी येत नसल्याचे पाहून चव्हाण यांनी खासगी वाहनाद्वारे दाभाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तिची प्रसूती केली. या हलगर्जीपणामुळे चिखली येथील ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  या उपआरोग्य केंद्राशी डावरगाव, मेव्हणा, विल्हाडी, किन्होळा, डोंगरगाव आदी गावांचा संपर्क येतो.

 

जबाबदार कोण ?
चिखली रुग्णालयात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन केले असता, केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली होती. यामुळे मुलीला त्रास झाला.   गांभीर्य नसल्यासारखे येथील कर्मचारी वागत होते. मुलीचे बरे वाईट झाले असते तर याला कोण जबाबदार असते, असा प्रश्न मुलीचे वडील जयहिंद पवार व आईने  केला.

 

कर्मचारी आता मुख्यालयी  
चिखली येथील उपकेंद्रातील तीन कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याबाबत नोटिसा काढल्यानंतर कर्मचारी तेथे थांबत आहेत. यामुळे आता चोवीस तास रुग्णांना सुविधा मिळणार आहेत.  
- डॉ. गटकळ, आरोग्य अधिकारी, दाभाडी  आरोग्य केंद्र.

 

दीड तास तारांबळ  
चिखली येथील उपकेंद्र नेहमीच बंद राहते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागला.
- जयहिंद पोमा पवार, गरोदर मातेचे वडील, चिखली

 

बातम्या आणखी आहेत...