आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्र यात्रोत्सवासाठी येडेश्वरी, तुळजाईनगरी झाली सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरमाळा / तुळजापूर - श्री क्षेत्र येडेश्वरी आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव शनिवारी (दि. ३१) सुरू होत आहे. दि.५ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या उत्सवासाठी तीर्थक्षेत्री जोरदार तयार सुरू आहे. यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी सोई-सुविधा मिळाव्यात,यासाठी  जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.


तुळजापुरात अपुऱ्या व्यवस्थेमुळे आमदार मधुकर चव्हाण यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. दरम्यान, येरमाळ्यात धर्मदाय आयुक्तांनी देवीच्या दानपेटीवर ताबा घेण्याचा निर्णय झाल्याने यावर्षीची श्री येडेश्वरीची यात्रा खऱ्या अर्थाने प्रशासकीय ठरणार आहे. सहायक आयुक्त शनिवारी दानपेटीचा ताबा घेतील.  येडेश्वरी देवीचा शनिवारी(दि.३१) छबिना, पंचोपचार महापूजा मुख्य रात्री साडेआठ वाजता होईल. रविवारी (दि.१) देवीच्या पालखीचे सकाळी साडेआठला आमराई मंदिराकडे प्रयाण होईल. मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता चुन्याच्या रानात पालखी आल्यावर होणार आहे. पालखी दुपारी १२ वाजता आमराई मंदिरात पाच दिवसांच्या मुक्कामासाठी विसावेल. सोमवारी (दि.२) सकाळी ११ वाजता पशुप्रदर्शन भरणार आहे. 

 

मंगळवारी (दि.३) दुपारी चार वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. याच दिवशी रात्री दहा वाजता भजनी मंडळ, आराधी मंडळाच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी रात्री ९ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून वाजत-गाजत शोभेच्या दारूची मिरवणूक निघाल्यावर आमराई मंदिर परिसरात शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता देवीच्या पालखीची महाआरती, घुगरी महाप्रसादाच्या वाटपानंतर देवीच्या पालखीचे डोंगरावरील मुख्य मंदिराकडे प्रस्थान होण्यासोबतच यात्रेची सांगता होणार आहे. 

 

सुविधा उभारल्या
यात्रेला आठ ते दहा लाख भाविक येतात. त्यामुळे  यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक, जि.प.कडून मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर, आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका, मंदिर, आमराई परिसरात चार आरोग्य बुथ, महावितरणकडून २४ तास विद्युत पुरवठा केला जात आहे.

 

तुळजापुरात प्रशासकीय यंत्रणेला मरगळ

तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा यात्रा सुरू होऊन दोन दिवस होऊनही भाविकांना सुविधा नसल्याने आमदार मधुकरराव  चव्हाण यांनी गुरुवारी (दि.२९) अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. पालिकेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी  चैत्र पौर्णिमा यात्रेच्या तयारीवर नाराजी व्यक्त केली.