आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यामध्ये सर्वदूर सरीवर सरी, दिवसभरात सूर्यदर्शन नाही; शेतकरी सुखावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- यंदाच्या हंगामातील मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यात सर्वदूर प्रथमच सोमवारी(दि.१६) दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता सुरू झालेला संततधार सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. यामुळे दिवसभरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 


सोमवारी सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद ४३ मिमी एवढी असल्याने या वर्षीचा हा सर्वात मोठा पाऊस ठरणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम केंद्रात हा पाऊस नोंदला गेला. सकाळी आठपर्यंत ०.९४ मिमी पावसाची नाेंद झाली होती. आजवर जिल्ह्यात २२९.५० मिमी पाऊस झाला आहे. 


जालना : जालना शहर, परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. ढगाळ वातावरणाने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी काही वेळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या जिल्ह्यात या वर्षी आजपर्यंत १८४ मिमी पाऊस झाला असून आजपर्यंतच्या अपेक्षित पावसाशी हे प्रमाण ७९.१७ टक्के आहे. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक २३९ मिमी पाऊस झाला. मंठा तालुक्यात २२२ मिमी पाऊस झाला आहे. जाफराबाद तालुक्यात सर्वात कमी १२२ मिमी पाऊस झाला अाहे. 


हिंगोली : जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपासून मागील २४ तासात सरासरी २६.५४ मिमी पाऊस झाला. आज पर्यंत जिल्ह्यात ४३.९० टक्के एवढा पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८.३८ टक्के जास्त आहे. आज सकाळी ८ वाजता मागील २४ तासात हिंगोली जिल्ह्यात झालेला पाऊस पुढील प्रमाणे आहे. त्यात हिंगोली तालुक्यात ७ मिमी, वसमत २.७१, कळमनुरी १२, औंढा नागनाथ २.५० तर सेनगाव तालुक्यात २.३३ मिमी असा एकूण सरासरी २६.५४ मिमी पाऊस झाला आहे. 

 

लातूर जिल्ह्यात सर्वदूर संततधार 
जिल्ह्यात रात्रीपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सोमवारी दिवसभरातही सकाळपासून संततधार सुरू होती. कित्येक वर्षांत सलग आठ दिवस सूर्यदर्शन झाले नसल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. केवळ रिमझिम सरी अधून मधून कोसळत होत्या. सोमवारी सकाळपर्यंत हीच स्थिती होती. सोमवारी दुपारनंतर मात्र शहरात जिल्ह्याच्या काही भागांत बहुतांश ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. 


बीड जिल्ह्यात भिजपावसाने आनंद 
जिल्ह्यातील पाटोदा, धारूर, शिरूर तालुक्यात सोमवारी सकाळपासून भिजपावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६३६ मिलिमीटर पाऊस झाला. अद्यापपर्यंत २६ टक्के पाऊस झाला. पाटोदा येथे सकाळी ११ वाजता पावसाला सुरुवात झाली. दिवसभर रिमझिम पाऊस होता. खरीप पिकाला आवश्यक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे. 


सिल्लोड, फुलंब्री वगळता आैरंगाबाद जिल्ह्यात दिवसभर संततधार 
जिल्हाभरात महिनाभरापासून दडी दिलेल्या पावसाने सोमवारी दमदार हजेरी लावली. फुलंब्री,सिल्लोड तालुका वगळता जिल्हाभरात पावसाची संततधार होती. जिल्हाभरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप होती. अधूनमधून उघडीप दिली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. वैजापुरातही दिवसभरात एक-दोन फटकारे वगळता मोठा पाऊस झाला नाही. 


नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस 
सोमवारी शहरात व जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. शहर, जिल्ह्यातील १४ तालुक्यात पाऊस झाला. शहरात सकाळपासूनच हलक्या पावसाला सुरुवात झाली. बारानंतर जोर वाढला. जिल्ह्यात रविवारी रात्रीही दमदार पाऊस झाला. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये सरासरी ७.८८ मिमी पाऊस झाला. सर्वाधिक ३३. ५० मिमीपाऊस माहूर येथे झाली.वार्षिक सरासरीच्या ४०. ९ मिमी पावसाची नोंद झाली. 


पाचव्या दिवशीही संततधार 
जिल्ह्यात सोमवारी म्हणजे सलग पाचव्या दिवशीही पावसाची रिपरिप झाली. पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडण्याचाही धोका निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. दडी मारलेला पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 

बातम्या आणखी आहेत...