आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळत ठेवत केला गोदामातून जाणाऱ्या १० ट्रकचा पाठलाग; कारखान्यावर धाड, रेशनचा साठा जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- फूड काॅर्पोरेशन आॅफ इंडियाच्या गोदामातून गहू व तांदळाचा साठा कंपनीत जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली. खात्री करीत पाळत ठेवून पोलिसांनी १० ट्रकचा पाठलाग केला. शेवटी कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील इंडिया मेगा अॅग्रो अनाज लिमिटेड कंपनीत धाड टाकून ८३ लाख रुपये किमतीचा गहू व तांदळाचा साठा पकडला. हा माल स्वस्त धान्य दुकानातून वितरित केला जाणारा होता. पोलिसांनी धान्यासह या मालाची वाहतूक करणारे १० ट्रकही जप्त केले. एकूण मुद्देमालाची किमत १ कोटी ८३ लाख रुपये आहे. 


कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील इंडिया मेगा अॅग्रो अनाज लिमिटेड कंपनी ही शहरातील मोठे प्रस्थ असलेले अजय बाहेती यांच्या मालकीची आहे. या कंपनीत स्वस्त धान्य दुकानातून वितरित केला जाणारा गहू व तांदूळ नेहमी पुरवला जातो, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. या धान्यापासून कंपनीत मैदा व इतर पदार्थ तयार केले जातात. तुुप्पा जवाहर नगरात असणाऱ्या फूड काॅर्पोरेशन आॅफ इंडियाच्या गोदामातून ट्रकच्या ट्रक माल या कंपनीला पुरवला जातो. बुधवारी या गोदामातून गहू व तांदळाचा साठा कंपनीत जाणार असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली. या माहितीनंतर पोलिस अधीक्षकांनी सापळा रचून हा सर्व माल जप्त केला. 


माहितीची केली खात्री 
गहू, तांदळाचा साठा गोदामातून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी आपले खास पथक या कामी नेमले. या पथकाने गोदामावर पाळत ठेवून १० ट्रक मध्ये गहू आणि तांदूळ भरण्यात आल्याची खात्री केली. त्यानंतर १० ट्रक कृष्णूर कारखान्याकडे निघाल्यानंतर या ट्रकचा पाठलाग केला. दहाही ट्रक बाहेती यांच्या कंपनीत पोहोचल्यानंतर पोलिसांनी धाड घालून हा साठा जप्त केला. यात ७५ लाख ९५ हजारांचा गहू आहे, तर ७ लाख ५४ हजाराचा तांदूळ आहे. ही कारवाई झाल्यानंतर स्वत: पोलिस अधीक्षक मीणा यांनीही कृष्णूर येथे जाऊन कारखान्याची सर्वंकष पाहणी केली. त्यानंतर दहाही ट्रक जप्त करून ते पोलिस मुख्यालयात आणून लावले

बातम्या आणखी आहेत...