आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडची शाखा सुरू करण्याआधीच केली चव्हाणांची हत्या; व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर येथील 'स्टेप बाय स्टेप' कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची सुपारी देऊन प्रोफेशनल शार्प शूटरच्या हातून हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट होते आहे. पोलिस अधीक्षकांनीही याला दुजोरा दिला आहे. मारेकऱ्यांनी चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली. त्यांची गाडी शिवाजी शाळा परिसरात येताच ती अडवून त्यांच्यावर कारच्या समोरून काचेतून जवळून गोळी झाडण्यात आली. गोळी झाडणाऱ्याचा नेम इतका अचूक होता की गोळी थेट चव्हाण यांच्या छातीत घुसली आणि चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ही हत्या व्यावसायिक स्पर्धेतूनच झाली असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी चव्हाण यांच्या "स्टेप बाय स्टेप' च्या नांदेडमधील शाखेचा प्रारंभ होण्याच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाली असली तरी पोलिस केवळ स्पर्धेच्या एका अँगलने तपास न करता इतरही विविध बाजू पडताळून पाहत आहेत. अविनाश चव्हाण यांचे आर्थिक व्यवहार हाही तपासाचा एक मुद्दा आहे, असे सांगण्यात आले. 


कोण होते अविनाश चव्हाण? 
एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात जन्म घेतलेल्या आणि विद्यार्थी दशेपासून मनसेत काम करणाऱ्या अविनाश चव्हाण यांनी अल्पावधीत मोठी झेप घेतली होती. कोचिंग क्लासेसमधील संधी शोधत त्यांनी हैदराबाद, कोटा येथून तज्ञ प्राध्यापकांना लातूरला आणले आणि व्यवस्थापन आपल्या हातात ठेवून कोचिंग क्लास सुरू केला. मनसेचे लातूर जिल्हा विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून काम करणाऱ्या चव्हाण यांनी काही वर्षांपूर्वी दिशा फिजिक्स कोचिंग क्लास सुरू केला. यासाठी हैदराबाद येथून एक प्राध्यापक आणून त्यांची वेतनावर नेमणूक केली. दोन वर्षांपूर्वी दिशा फिजिक्स कोचिंग क्लासचे रूपांतर स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसमध्ये करण्यात आले. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयाचे हे क्लासेस आहेत. यातून चांगले पैसे मिळू लागल्यानंतर त्यांनी वर्षभरापूर्वी अडाल्फ जीम सुरू केले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी हे जीम दुसऱ्याला चालवायला देऊन पूर्ण लक्ष कोचिंग क्लासेसवर केंद्रित केले. त्यांनी क्लासचा विस्तार करीत यावर्षी नांदेडला शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवारीच त्याचा प्रारंभ होणार होता. लातूर-नांदेडमधील इतर क्लासेस एका विषयासाठी ३० हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारत असताना चव्हाण यांनी ७ ते ८ हजारांचे शुल्क ठेवले होते. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांचा ओढा तिकडे वाढला होता. मात्र त्यांच्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांचे हितशत्रूही निर्माण झाले. त्यांनी मोठ्या आर्थिक उलाढालीही केल्याची माहिती पुढे येत आहे. नांदेड येथे त्यांनी मोक्याच्या जागेवर कोट्यवधी रुपयांची जागा घेतल्याची चर्चा आहे. अल्पावधीत आणि अत्यंत कमी वयात त्यांनी केलेली आर्थिक प्रगती थक्क करून टाकणारी होती. 


उशिरापर्यंत नाही अंत्यसंस्कार 
दरम्यान, चव्हाण यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतरही नातेवाइकांनी तो ताब्यात घेण्यास नकार दिला. जोपर्यंत संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ठाणे येथील वडार समाजाचे नेते ठाणे येथून निघाले असून ते लातूरला येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशीही भूमिका नातलगांनी घेतली. पोलिसांनी जबरदस्ती केली तर रास्ता रोको केला जाईल, असा इशाराही देण्यात आला. अविनाश चव्हाण विवाहित होते. त्यांना दोन लहान मुले असल्याचे चव्हाण यांच्या कुटुंबातील निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. 


शहरातील सर्वच कोचिंग क्लासेस परिसरात शुकशुकाट 
लातूरमध्ये पहिल्यांदाच असा प्रकार झाल्यामुळे सोमवारी दिवसभर एकही कोचिंग क्लास उघडला नाही. कोचिंग क्लासेस परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. एरवी सकाळी पाच वाजल्यापासून या परिसरात गजबजाट असतो. मात्र मध्यरात्री खुनाचा प्रकार झाल्याचे कळाल्यानंतर सर्व क्लासचालकांनी अघोषित बंद पाळला. विद्यार्थ्यांनाही हा प्रकार कळाल्यानंतर धक्का बसला. सध्या प्रवेशाचे दिवस असून नेहमीपेक्षा जास्तच गजबज या परिसरात पाहायला मिळते. 

 

बातम्या आणखी आहेत...