आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदानाकडे गावाने पाठ फिरवली, दोघे भाऊ करतात श्रमदान; 60 समतल चर खोदले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - गाव पाणीदार करण्यासाठी परळी तालुक्यातील बाराशे लोकसंख्येच्या  तडोळी गावातील दोन भावांनी निश्चय केला  आहे. एकीकडे वॉटर कपच्या श्रमदानासाठी संपूर्ण  गावाने पाठ फिरवली असली तरी दुसरीकडे दोघे सातभाई बंधू एक महिन्यापासून गावात श्रमदान करत आहेत. यातील पुण्यातील एमपीएससीचे क्लास वाऱ्यावर सोडून  सोमेश्वर सातभाई हा तरुण गावात श्रमदान करत आहे. एक महिन्यात या भावडांनी ६० समतल चर खोदले असून गावचे उपसरपंच त्यांना आर्थिक मदत करत आहेत. फेसबुकवरील पोस्ट वाचून मुंबई येथील आयकर विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद चाफेकर यांनी तडोळी गावात येऊन एक दिवस सहा तास श्रमदान केले. परंतु गावातील लोक श्रमदानासाठी यायला तयार नाहीत.  


परळी तालुक्यातील तडोळी गावाने यंदा वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे.  वॉटर कपसाठी गावातील संपत सातभाई, मीरा सातभाई, उषा सातभाई, अनिता सातभाई, सरपंच अशोक सिरसाट या पाच जणांनी लातूर जिल्ह्यात प्रशिक्षण घेतले. गावात आल्यानंतर ६ एप्रिलला पहिली ग्रामसभा घेऊन लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून  दिले. ग्रामसभेत माना डोलवून पाण्याचे महत्त्व एेकणाऱ्या ग्रामस्थांनी मात्र गावच्या श्रमदानासाठी दुसऱ्याच दिवशी पाठ फिरवली. मागील २८ दिवसांपासून संपत सातभाई त्यांचा चुलत भाऊ सोमेश्वर सातभाई हे दोघे गावातील डोंगरावर श्रमदान करत आहेत.

 

केवळ  १० एप्रिल  रोजी सरपंच अशोक सिरसट, उपसरपंच वैजीनाथ सातभाई, लखन सिरसाट, राजाभाऊ जाधव, जिवराज सातभाई अशा सात जणांनी एक तास श्रमदान केले.  १३ एप्रिल रोजी परळीचे गटविकास अधिकारी गावात आल्याचे पाहून उगीच गावची बदनामी नको म्हणून २५ लोकांनी श्रमदान केले.  गावातील वॉटर कपच्या श्रमदानासाठी पुण्यातील एमपीएससीचे क्लास बुडवून गावात आलेला सोमेश्वर निराश होऊन २२ एप्रिलला पुण्याला निघून गेला. २३ एप्रिला संपत आणी वैजीनाथ या दोघांनी श्रमदान केले, तर २४ ते २७  एप्रिलपर्यंत एकट्या संपत सातभाई याने श्रमदान केले. 


गावातील श्रमदानासाठी कोणीच नाही  म्हणून घालमेल होत असल्याने २८ एप्रिलला सोमेश्वर पुन्हा गावात श्रमदानासाठी आला. उपसरपंच वैजीनाथ सातभाई यांनी गावातील श्रमदानासाठी टिकाव, खोरे, टोपले हे साहित्य पदरमोड करून आणले आहे. श्रमदानासाठी येणाऱ्या लोकांच्या नाष्टा व  चहापाण्याची सोय ते करत असून लोक मात्र श्रमदानासाठी शिवारात येण्यासाठी तयार नाहीत.  सोमेश्वर याने निराशेतून गावातील श्रमदानाला कोणीच येत नाही, आम्ही दोघेच श्रमदान करत आहोत अशी पोस्ट फेसबुकवर पोस्टही केली आहे.

 

एमपीएससीचा क्लास बुडवून तरुणाचे श्रमदान
सोमेश्वर हा सध्या पुण्यातील शिवाजीनगर येथे द युनिक अकॅडमीत एमपीएससीचे क्लास करत आहे. हे क्लास बुडवून तो गावात मागील २८ दिवसांपासून भावाबरोबर श्रमदान करत आहे. वॉटर कप स्पर्धा पूर्ण झाल्यानंतरच १७ दिवसांनी तो पुण्याला जाणार आहे.

 

लोकांचा गैरसमज झाला   
वॉटर कपच्या श्रमदानात उपसरपंचासह सातभाई बांधवांना काहीतरी फायदा होत आहे असा गैरसमज गावातील लोकांचा झाला आहे. त्यातच नागापूर धरणाचे पाणी पाइपलाइनद्धारे गावात आलेले असून हेच पाणी पुरेल. त्यामुळे श्रमदान करण्याची काहीच गरज नाही असे काही ग्रामस्थांना वाटत असल्याने त्यांनी श्रमदानाकडे चक्क पाठ फिरवली आहे.  
संपत सातभाई, तडोळी, ता. परळी    

 

बातम्या आणखी आहेत...