आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपळगाव रेणुकाई- अाजघडीला प्रत्येकासमोर काही ना काही अडचणी असतातच. त्या अडचणींवर मात करून यश मिळवणारे बाेटावर मोजण्याइतकेच व्यक्ती असतात. दरम्यान, पिंपळगाव रेणुकाई परिसरात दोन अपंग तरुण पाच वर्षांपासून सोबत राहतात. एक जण पायाने तर एक डोळ्यांनी अंध आहे. या दोन्ही अपंगांनी आपल्या शारीरिक व्यंगाचे रडगाणे न गाता त्यावर मात करत जीवनगाणे गाण्यास सुरुवात केली. बाजारपेठ, बसस्थानकांसह गर्दीच्या ठिकाणी सामाजिक, देशभक्ती, राष्ट्रीय गीतांचे गायन करून ते तरुणांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम करत आहेत. या गायनातून दोघांना जगण्यासाठी नवी उमेद तर मिळतच आहे. सुदृढ समाज घडवण्यातही त्यांचे योगदान मिळत आहे. घट्ट मैत्रीमुळे या दोघांना अनेक जय-वीरू या नावानेच संबोधतात.
सिल्लोड तालुक्यातील मादनी या गावातील शिवाजी फकिरा क्षीरसागर हा पायाने तर निल्लोड येथील कुंडलिक किसन शिंदे हा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. दोघांच्याही घरची परिस्थिती बिकट आहे. पाच वर्षांपासून एकत्र राहत या दोघांनी आपल्या मंजूळ वाणीतून सामाजिक व देशभक्तिपर गीते गायला सुरुवात केली. यातून मिळेल त्या पैशातून ते उपजीविका करत आहेत. गावागावात जाऊन सार्वजनिक ठिकाणी, पारांवर, चौकात, आठवडी बाजारात ही अंध-अपंगाची जोडी सायकल ढकलत जाऊन लोकांची करमणूक करीत आहे. यासोबतच सामाजिक, राष्ट्रीय गीतांचे गायन करून नागरिक, तरुणांना स्फूर्ती देण्याचे काम करीत आहेत. देशभक्तिपर गीतांबरोबरच सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मूलन आदींवरही गाणे गात जनजागृती करीत आहेत. त्यांची सामाजिक धडपड पाहून नागरिकही थोडा वेळ देऊन या मित्रांचे गाणे ऐकतात. ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा’ असे म्हणत पोटाची खळगी भरतानाच गायन या कलेला त्यांनी आपल्या जीवनाचा आधार बनवले आहे.
मनाने अपंग नाही
आम्हाला जन्मताच नियतीने अपंग केले असले तरी आम्ही मनाने अपंग नाही. संघर्षमय जीवन आम्हाला जगण्याचे बळ देते, असे कुंडलिक शिंदे व शिवाजी क्षीरसागर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.