आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासाठी मुलींचे महापुरुषांना साकडे; उन्हात 3 तास अभ्यास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- बेटी बचाव, बेटी पढाव अशा घोषणा सरकारी पातळीवरून दिल्या जात असतानाच सरकारच्याच एका निर्णयामुळे लातूरमधील ९०० विद्यार्थिनींचा तंत्रनिकेतनचे शिक्षण घेण्याचा रस्ता कायमचा बंद होतो. वारंवार मागणी करूनही तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय थांबवणार नसल्याच्या सरकारच्या धोरणाचा लातूरमधील मुलींनी रविवारी अनोख्या पद्धतीने निषेध केला. या मुलींनी महापुरुषांचा फोटो समोर ठेवून भर उन्हात तीन तास अभ्यास केला. मुलींच्या या गांधीगिरीची जोरदार चर्चा होत असून सरकार काय निर्णय घेतेय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  


लातूरमध्ये अनेक वर्षांपासून  १५०० विद्यार्थी क्षमता असलेले पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन कार्यरत आहे. त्याच जोडीला महिला निवासी तंत्रनिकेतनही कार्यरत आहे. तेथे ९०० मुलींच्या निवासी शिक्षणाची सोय आहे. लातूरसारख्या ठिकाणी असलेल्या या तंत्रनिकेतनमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून आलेल्या मुली शिक्षण घेतात. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि कामगारांच्या मुलींची संख्या सर्वाधिक आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी औरंगाबादला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचा दर्जावाढ करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यातच महिला निवासी तंत्रनिकेत बंद करून त्याचा समावेश नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून लातूरमधील २४०० मुलांचे तंत्रनिकेतनचे शिक्षण बंद होणार आहे. त्यांना इतरत्र जावे लागणार आहे. त्यामध्ये ९०० मुलींचाही समावेश असेल. 


त्याचबरोबर भविष्यात मुलींच्या तंत्रशिक्षणाची दारेही बंद होणार आहेत. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव असा नारा द्यायचा आणि दुसरीकडे मुलींच्या शिक्षणाची दारे बंद करायची, असा हा निर्णय असल्याची भावना तेथे शिकणाऱ्या मुलींच्या मनामध्ये तयार झाली आहे.   या निर्णयाविरोधात मागील दोन वर्षांपासून अनेक आंदोलने झाली. राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनीही त्यात सहभाह घेतला. काही संघटनांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आहे. पण अद्याप तेथून आशेचा किरण उगवलेला नाही.  

 

विद्यालयात उपाेषण 
राज्यातील युती शासन हा निर्णय बदलेल आणि अभियांत्रिकी महाविद्यालय आले तरी जुने तंत्रनिकेतन बंद होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून मुली काळ्या पट्ट्या बांधून विद्यालयात येत असून साखळी पद्धतीने विद्यालयाच्या आवारात उपोषणही सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...