आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाच्या विकाराला कंटाळून पोलिसाची गळफाास घेऊन आत्महत्या, जालनामधील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जालना पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. गणेश इंदाराम वाळूंज असे मृताचे नाव आहे. पोटाच्या विकाराला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे या युवकाने म्हटले आहे. त्याच्याकडे एक ‘सुसाइड नोट’ आढळून आली असून त्यात त्याने अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे.


पोलिस या सुसाइड नोटचीही खातरजमा करत आहेत. जगून देश सेवा करण्याची इच्छा होती, परंतु मरूनही या सुंदर जगात राहण्याची इच्छा त्याने या सुसाइड नोटमध्ये व्यक्त केली आहे.  
मुंबई पोलिस दलात भरती झालेला गणेश इंदाराम वाळूंज (२६) हा गतवर्षी मुंबई पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाला होता. त्यानंतर ८ जानेवारी २०१८ रोजी तो जालना पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. मंगळवारी सकाळी  शहरातील सीटीएमके गुजराती शाळेजवळील स्मशानभूमीजवळील चिंचेच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार सदर बाजार पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित प्रकाराची माहिती घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी भोकरदन नाका पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली असून त्यात आपण पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे  नमूद केले आहे. पोटाच्या आजारावर अनेक उपचार केले. मात्र त्याचा काहीच फरक पडला नसल्याने आपण हा निर्णय घेतला आहे. शिवाय मृत्यूनंतर आपले अवयवदान करण्यात यावे, अशी इच्छा त्याने सुसाइड नोटमध्ये व्यक्त केली आहे.  

 

पीटीनंतर बाहेर पडला
गणेशने सकाळी पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पीटीच्या तासाला हजेरी लावली. त्यानंतर नाष्ट्यासाठी सुटी झाली तेव्हा सकाळी ८.३०च्या सुमारास तो कोणत्याही परवानगीशिवाय पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर पडला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्याने शेरी भागात चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

अशी आहे सुसाइड नोट    
मी गणेश इंदाराम वाळूंज, सी-१२३/ ५ मी माझ्या स्वखुशीने आत्महत्या करत आहे. मला कोणाचाही काहीच त्रास नाही. नेहमी पोटाचा त्रास खूप होतो तो सहन होत नाही. इलाज केले, परंतु तरीही त्रास होतच आहे त्यामुळे जगण्याची मज्जाच राहिली नाही. माझ्या मृत्यूनंतर माझे शक्य तितके अवयवदान करावेत. जगून देश सेवा करण्याची इच्छा होती, परंतु मरूनही या सुंदर जगात राहण्याची इच्छा आहे. 

बातम्या आणखी आहेत...