आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धाला वाचवताना केमिकलच्या टँकरची एसटीला जोराची धडक; १५ प्रवासी जखमी, औरंगाबादेत उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई /जाफराबाद- रस्त्यात आलेल्या वृद्धाला वाचवण्याच्या प्रयत्नात समोरून भरधाव येणारा केमिकलचा टॅँकर बसवर धडकल्याने बसचालकासह पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील कोल्हापूर पाटीजवळ सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. यातील जखमींवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. 


बुलडाण्याकडून माहोरा रोडवरून औरंगाबादकडे बस (एमएच २० डीएल २०६३) जात होती. दरम्यान, ही बस कोल्हापूर पाटीजवळ पोहोचली असता, वृद्ध रस्ता ओलांडत होता. याप्रसंगी चालकाने प्रसंगावधानाने वृद्धाला वाचवले. परंतु, याच प्रसंगी समोरून येणारा भरधाव केमिकलचा टँकर (एमएच ०४ जीएफ ५३०१) बसवर येऊन धडकला. समोरासमोर झालेल्या या अपघातात बस व ट्रकचा समोरचा भाग चेपला. यात बसमधील प्रवासी समोरच्या खुर्च्यांवर आदळल्यामुळे कुणाचे डोके, कुणाच्या डोळ्याला तर कुणाच्या हाता-पायाला इजा झाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी येऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. गंभीर जखमींवर औरंगाबाद येथे तर किरकोळ जखमींवर भोकरदन, माहोरा, जाफराबाद येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात घडल्यानंतर बराच वेळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


१०८ अॅम्ब्युलन्सची मदत 
अपघात घडल्यानंतर प्रवाशांतील काही जणांनी जाफराबाद येथील १०८ अॅम्ब्युलन्सला ही माहिती दिल्यानंतर तत्काळ ही गाडी दाखल होऊन उपचारासाठी जखमींना विविध रुग्णालयांत नेण्यासाठी मदत केली. 


शेतकऱ्यांची मदत 
टॅँकरने दिलेल्या धडकेत बस रोडच्या बाजूला असलेल्या शेतात ढकलली गेली. धडक झाल्याचा मोठा आवाज झाल्यामुळे परिसरात लागवड करीत असलेल्या शेतकरी, महिलांनी या ठिकाणी धाव घेत कुणी पाणी दिले, तर कुणी जखमींना गाडीत बसवण्यासाठी मदत केली. 


हे आहेत जखमी 
बसचालक नंदू रामचंद्र शिपने (५०, रा. देऊळ घाट, ता. सिल्लोड), केमिकल टँकर चालक बसवराज यादव (४५, बिहार), विशाल मधुकर जाधव (कोल्हापूर), ऋषिकेश सरोदे (रा. चिंचखेडा), नवलसिंग मानसिंग जाधव, रामेश्वर दौड (माहोरा), केशवराव विनायकराव लहाने (घानखेडा), सिद्ध नारायण सरोदे (चिंचखेडा), संतोष पांडुरंग राऊत (बुलडाणा) आदी जखमींची नावे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...