आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपवर फोटो टाकताच12 तासांत मिटणार अस्वच्छतेची कटकट; कळंब पालिकेचेे स्वच्छता अॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब- परिसरात साचलेला कचऱ्याचा ढीग, घंटागाडी न आल्यास आता अँड्रॉइड मोबाइलद्वारे फोटो काढून ‘स्वच्छता अॅप’वर टाका. नगर परिषदेकडून १२ तासांत तक्रारीचे निवारण होईल.

   
देशभरात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत कळंब नगर परिषदेने शनिवारपासून (दि. ९) ‘स्वच्छता अॅप’चा उपयोग सुरू केला आहे. अॅपची सुरुवात होताच येथील सुनील मार्केटमधील कचऱ्यासंदर्भात एक तक्रार आली आहे.  नागरिकांच्या तक्रारीनंतर १२ तासांत निवारण झाल्यानंतर स्वच्छता निरीक्षकाला तसा फोटो शासनाच्या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पालिकेने शहरात ‘स्वच्छता अॅप’संबंधी माहितीचे फलक लावले आहेत. या सुविधेचा नागरिकांनी वापर करून सर्वेक्षण अभियानात सहभागी व्हावे, सुंदर व स्वच्छ शहर बनवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे व मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी केले आहे.   


दरम्यान, शहरांत कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. व्यापारी संकुल, भाजी मंडई, बसस्थानक परिसरात समस्येने उग्र रूप धारण केले आहे. कचराकुंड्या वेळेवर उचलण्यात येत नाहीत, मृत प्राणी वेळेत न उचलल्याने दुर्गंधी पसरते, तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने नागरिक निराश होतात.   

 

असे होईल निवारण    
नोंदवलेली तक्रार नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडे जाईल. तेथून संबंधित क्षेत्राच्या जबाबदार अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल. यानंतर तक्रारीचे निवारण केल्यावर त्या जागेचा फोटो काढून स्वच्छता निरीक्षकाने पोर्टलवर अपलोड केल्यावर तक्रारकर्त्याला झालेल्या कामाचे छायाचित्र दिसेल.

 

असे वापरा स्वच्छता अॅप   

- केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने स्वच्छता अॅप विकसित केले आहे. वापरण्यासाठी मोबाइलमधील प्ले स्टोअरवर क्लिक करा. त्यावर स्वच्छता अॅप एमओयूडी शोधा. ते डाऊनलोड करा, पसंतीची भाषा निवडा. अॅप आपला मोबाइल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करा. 
- तुम्हाला लगेच ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा, या पर्यायावर क्लिक करा. अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवायची असल्यास त्या जागेचा फोटो काढा, संबंधित तक्रारीवर (कचरा गाडी आली नाही, कचरा साचला आदी) क्लिक करा. 
- तुमच्या परिसराचे लोकेशन, लगतचे ओळखीचे स्थळ टाइप करा. मोबाइल स्क्रीनवर ‘पोस्ट करा’शब्द दिसेल, त्यावर क्लिक करा. लगेच तुमची तक्रार मिळाल्याचा संदेश मिळेल.   

बातम्या आणखी आहेत...