आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात धुण्यासाठी कालव्यात गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, चप्पलमुळे लागला सुगावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - सरपण घेऊन घराकडे निघालेली  सहावीत शिकणारी विद्यार्थिनी हात धुण्यासाठी मांजरा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात उतरली असता पाय घसरून पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील धानोरा शिवारात घडली. रात्री ग्रामस्थांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु कालव्यात जास्त पाणी असल्याने मृतदेह सापडला नाही.  शेवटी पाणी बंद केल्यानंतर कोपरा शिवारातील विद्युत पंपाला अडकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.  सुप्रिया वैजनाथ गायसमुद्रे (वय ११ )असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.


धानोरा खुर्द येथील वैजनाथ गायसमुद्रे हे सालगडी  असून त्यांची पत्नी मोलमजुरी  करते. त्यांची मुलगी सुप्रिया हिने धानोरा खुर्द गावापासून जवळ असलेल्या सोमनाथ बोरगावच्या दत्त विद्यालयात सहावीची परीक्षा दिली होती.   आईला मदत म्हणून ती गावातीलच शेतामध्ये सरपण आणण्यासाठी गेली होती.  डोक्यावर सरपण घेऊन येत असताना तिने सरपणाचा भारा खाली टाकून ती  कॅनॉलमध्ये  हात धुण्यासाठी उतरली.  या वेळी पाय घसरून ती  कालव्यात पडली. तिचे आजोबा तिला शोधण्यासाठी कालव्याजवळ गेले असता  तिची चप्पल कालव्या शेजारी दिसून आली. ती  कालव्यात बुडाल्याचा संशय बळावल्याने त्यांनी गावातील  लोकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कालव्यामध्ये शोधाशोध सुरू झाली.  काही ग्रामस्थांनी मांजरा धरणाच्या अभियंत्याला फोन करून डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची विनंती केली.  मात्र धरणाच्या  कर्मचाऱ्यांनी पाणी बंद केले नाही.  ग्रामस्थांनी मध्यरात्रीपर्यंत मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. धरणाचे अधिकारी पाणी विसर्ग थांबवत नसल्याने ग्रामस्थांनी युसूफवडगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.    पोलिसांनी धरणाच्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांना कालव्यातील  पाणी बंद करण्याच्या सूचना केल्या.  कालव्यातील सर्व पाणी निघून गेल्यानंतर शुक्रवार सकाळी सुप्रियाचा मृतदेह कोपरा शिवारातील विद्युत मोटारीच्या पाइपला अडकल्याचे दिसून आले. 

 

पोलिसांनी मृतदेहाची स्वारातीमध्ये उत्तरीय तपासणी करून तो  नातेवाइकांच्या ताब्यात दिला.  या प्रकरणी युसूफवडगाव पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुप्रिया आईवडिलांना एकुलती एक होती.

 

चप्पलमुळे लागला सुगावा
सुप्रियाचे आजोबा  शेतामध्ये काम करत होते. सरपण घेऊन गेलेली आपली नात कालव्याच्या शेजारीच सरपणाचा गठ्ठा टाकून कुठे गेली असावी, याचा ते शोध घेत होते.  मात्र कालव्याशेजारी तिच्या पायातील चप्पल आढळून आल्याने ती कालव्यात पडली असावी, अशी शंका त्यांना आली होती.

बातम्या आणखी आहेत...