आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड : धावत्या एसटी बसमध्ये महिलेची प्रसूती; जन्मताच बाळ दगावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - प्रसूती कळा सुरू झाल्याने जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच महिलेची चालत्या बसमध्ये  प्रसूती झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान  तालुक्यातील जरूड येथे घडली. सोबत असलेली आशा कार्यकर्ती व बसमधील महिला प्रवाशांनी प्रसूती केली. इतर प्रवाशांनी जिल्हा रुग्णालयाला ही माहिती कळवताच  नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व रुग्णावाहिका जरुड फाट्यावर पाठवण्यात आली. महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेल परंतु, तत्पूर्वीच बाळाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दोन दिवसंपूर्वी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या या महिलेला प्रसूतीसाठी आणखी दहा दिवसांचा अवधी असल्याचे सांगत गुरुवारी सुट्टी देण्यात आली होती.


वर्षा व्यंकटी देवकते या केज तालुक्यातील रहिवासी आहेत. बाळंतपणासाठी त्या माहेरी बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथे आल्या होत्या.  पोटात दुखू लागल्याने प्रसूतीसाठी तीन दिवसापूर्वीच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल  करण्यात आले होते. परंतु, प्रसूतीसाठी अद्याप दहा दिवसांचा अवधी असल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. गावी गेल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. आई इंदू पालवे, गावातील आशा कार्यकर्ती मीना गिरी या वर्षा यांना  हिवरापहाडी-बीड या बसमधून(क्र. एम.एच. २० डी. ८३६३) जिल्हा रुग्णालयात घेऊन येत होत्या. मात्र वाटेतच जरूडजवळ  वर्षा यांची दुपारी बारा वाजेच्या दरम्यान चालत्या बसमध्ये प्रसूती झाली. मीना गिरी, इंदू पालवे व इतर सहप्रवाशी महिलांनी वर्षा यांची बसमध्येच प्रसूती केली. त्यांनी मुलाला जन्म दिला. दरम्यान, इतर काही प्रवाशांनी आराेग्य विभागाला याची माहिती दिल्यानंतर नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका यांना रुग्णवािहका घेऊन तत्काळ जरुड फाट्यावर जाण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी नरेंद्र कासट यांनी दिल्या. त्यांनी जाऊन वर्षा व बाळावर प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेेतून बीड जिल्हा रुग्णालयात 
दाखल केले.

 

बाळ दगावले
जिल्हा रुग्णालयात बाळ व मातेला दाखल केल्यानंतर  तज्ज्ञांनी बाळाची तपासणी करून ते मृत जाहीर केले. तर वर्षा यांच्यावर  उपचार सुरू आहेत. दरम्यान, बाळ जन्मतानाच मृत्यू पावले  की त्याला वेळेत आरोग्य सुविधा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला याबाबत  आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

श्वास गुदमरुन मृत्यू
बाळाचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आशा कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बाळ पोटातच दगावल्याने मृत बाळाचीच प्रसूती झाली होती परंतु, सर्व चौकशीनंतरच योग्य कारण समोर येईल. चौकशी सरू आहे
डॉ. नरेंद्र कासट, तालुका आरोग्य अधिकारी, बीड

 

नातेवाइकच म्हणाले, रुग्णवाहिका नको
दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कासट यांच्या म्हणण्यानुसार,  वर्षा यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर गावातील आशा कार्यकर्ती मीना गिरी यांनी रुग्णवाहिकेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वर्षा यांच्या आईनेच त्यांना रुग्णवाहिका येण्यास वेळ लागेल बस आलीच आहे तर बसमधून जाऊ असे म्हणत रुग्णवहिकेला नकार दिला होता. 

 

वर्षा यांना पहिल्या दोन मुली : वर्षा देवकते यांची बाळंतपणाची ही तिसरी खेप होती. यापूर्वीच्या त्यांना दोन मुली आहेत. दोन मुलीनंतर शुक्रवारी त्यांनी मुलाला जन्म दिला, परंतु योग्य वेळी सुविधा न मिळाल्याने तो दगावला.

 

बातम्या आणखी आहेत...