आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी फलक तोडले, नावाच्या पाट्या अधिकाऱ्यांनाच काढायला लावल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशासकीय इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर लावलेला इंग्रजीतील फलक मनसे कार्यकर्त्यांनी खुर्ची आदळून तोडला, तर एका अधिकाऱ्यालाच त्याच्या कार्यालयासमोरील नेमप्लेट काढायला लावली. - Divya Marathi
प्रशासकीय इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर लावलेला इंग्रजीतील फलक मनसे कार्यकर्त्यांनी खुर्ची आदळून तोडला, तर एका अधिकाऱ्यालाच त्याच्या कार्यालयासमोरील नेमप्लेट काढायला लावली.

उस्मानाबाद - शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये लावलेल्या इंग्रजीच्या पाट्या व नामफलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढून फोडून टाकले. तसेच काही ठिकाणी अधिकाऱ्यांनाही फलक स्वतःच्या हाताने काढण्यासाठी भाग पाडले. इंग्रजीतून लिहिलेली आद्याक्षरे, आकड्यांच्या पाट्याही टेबलावरून ओरबाडून फोडून टाकल्या.   
शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा पूर्णपणे वापर व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढून सर्व प्रशासकीय कार्यालयांना मराठीचा वापर करण्याबाबत तंबी दिली आहे.

 

यामध्ये कार्यालयाबाहेरील  पाट्या व नामफलक केवळ मराठीतून लिहिण्याबाबत बजावले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये पूर्णपणे मराठीचा वापर करण्याबाबत परिपत्रकात स्पष्ट उल्लेख असतानाही अनेक कार्यालयांमध्ये आजही इंग्रजीचा सर्रास वापर केला जात आहे. कार्यालयातील कागदपत्रे, कार्यालयांच्या नावाच्या पाट्या, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नामफलक इंग्रजीतून लिहिण्याची अद्यापही क्रेझ आहे. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात पाहणी केली असता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक कार्यालयाच्या बाहेर इंग्रजीमधून फलक लावले असल्याचे आढळून आले. 


इंग्रजीमध्येच अधिकाऱ्यांची नामफलकही लावण्यात आले आहेत. या संदर्भात बुधवारी (दि. २३) ‘दिव्य मराठी’ने ‘मराठी वापराचा अध्यादेश मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पोहोचलाच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव दादासाहेब कांबळे यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जोरदार घोषणाबाजी करत इंग्रजीमधून लिहिलेले फलक काढून फेकून दिले. काही ठिकाणी असलेल्या अधिकारांचा पाट्या काढून टाकल्या मोडून टाकल्या. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा धसक्याने काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपण होऊन सर्व इंग्रजीतील फलक काढून टाकले. तसेच भिंतीवर लिहिलेले कार्यालयाचे इंग्रजीची नावेही रंगवून मिटवली. त्यावर कागदही लावले. 


अधिकाऱ्यांना तंबी 
काही कार्यालयांमध्ये इंग्रजीतून लिहिलेल्या मार्गदर्शक सूचना व इंग्रजीतूनच लिहिलेले नामफलक होते. होत्या या सर्व पाट्या व फलक तातडीने मराठीतून लिहिण्याची तंबी दिली. गुरुवारपर्यंत बदल न केल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशारा नवगिरे व कांबळे यांनी दिला. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून पळापळ सुरू केली. 

 

अधिकाऱ्याचा तोरा उतरवला 
जिल्हा जलसंवर्धन अधिकाऱ्याने मोठ्या तोऱ्यात दोन इंग्रजीतून पाट्या लावल्या होत्या. या पाट्या याच कार्यालयातील सहायक जलसंवर्धन अधिकारी पी. व्ही. शेळके यांना स्वतःच्या हाताने काढून टाकाव्या लागल्या. काढून टाकलेल्या पाट्या अधिकाऱ्यांच्या समोरच फोडून टाकण्यात आल्या. कार्यालयात इंग्रजीचे फलक दिसल्यास कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 

 

आकड्यांचे फलक काढले 
काही कार्यालयांमध्ये आकडेही इंग्रजीतून लावण्यात आले होते. तसेच मराठीतून फलक लिहिलेले असतानाही त्यावर अधिकाऱ्यांची आद्याक्षरे इंग्रजीतूनच लिहिण्यात आली होती. यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन तातडीने फलक काढण्यासंदर्भात सर्वांना सांगितले. कृषी कार्यालयातील सर्व इंग्रजीतील आकड्यांच्या पाट्या फाडून टाकण्यात आल्या.

 

 

बातम्या आणखी आहेत...