आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार शिक्षक आले उशिरा; ग्रामस्थांनी राष्ट्रगीत घेऊन शाळेला ठोकले कुलूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रगीतानंतर शाळेच्या गेटला कुलूप ठोकताना वाईतील ग्रामस्थ. - Divya Marathi
राष्ट्रगीतानंतर शाळेच्या गेटला कुलूप ठोकताना वाईतील ग्रामस्थ.

वाटूर- शाळा सुरू होण्याच्या वेळेवर सकाळी ९ वाजता आठही शिक्षक शाळेत हजर न झाल्यामुळे वाई येथील संतप्त ग्रामस्थांनीच विद्यार्थ्यांचे राष्ट्रगीत घेतले. यानंतर ९.३० वाजेच्या सुमारास चार शिक्षक शाळेत आले. याप्रसंगी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून शिक्षकांनाच ‘धडा’ शिकवल्याचा प्रकार मंठा तालुक्यातील वाई येथील जिल्हा परिषद शाळेत घडला.


 वाई येथील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत २१७ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी  मुख्याध्यापकासह आठ शिक्षक नियुक्त आहेत. परंतु येथील सर्वच शिक्षक हे दररोजच उशिरा येतात. मुख्याध्यापकाचेही दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक दिवसांपासून या शाळेचा कारभार ढेपाळला आहे. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यामुळे याबाबत शिक्षक, मुख्याध्यापकांना वारंवार तक्रारी करूनही जिल्हा परिषद शाळेचा कारभार सुधारत नव्हता. मुख्याध्यापक कुठल्याही प्रकारची नोटीस न काढता मनमानी कारभार करत अाहेत. 


गावातील शैक्षणिक दर्जा सुधारावा या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या. परंतु शिक्षण विभागाने याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे.  यामुळे   विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना ‘धडा’ शिकवण्यासाठी ग्रामस्थ मंगळवारी शाळेत दाखल झाले आणि शाळेत मुलांची प्रार्थना घेऊन शाळेला कुलूप ठोकले. 

 

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच स्वाती दत्ताराव उबाळे, दिगंबर उबाळे, सुनील ठाकरे, भगवान चौडे,  संदीप अंभोरे, दत्ता उबाळे, रामेश्वर उबाळे आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 

मुख्याध्यापक बदलीची मागणी   

शाळा वेळेवर न भरवणे, मुलांना शालेय पोषण आहार न देणे, शाळेच्या विकासासाठी किंवा शाळेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मासिक सभा मुख्याध्यापक घेत नसल्याने मुख्याध्यापकांची बदली करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

 

नोटीस दिली  

ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पांगरी केंद्रात पर्यायी शिक्षक पाहून वाईतील मुख्याध्यापकांना इतर शाळेत हलवण्यात येईल. जे शिक्षक गैरहजर राहतात त्यांना नोटीस देऊन तत्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले.    
-एम. डी. राठोड, गटशिक्षणाधिकारी मंठा. 

 

 प्रशिक्षणास गेलो होतो  

मंगळवारी केंद्र पांगरी गोसावी येथे मूलभूत क्षमता विकासासंदर्भात प्रशिक्षणासाठी आम्ही तीन शिक्षक गेले होतो. एक शिक्षक बदलीवर श्रीराम तांडा येथील शाळेवर आहे.  चार शिक्षक शाळेत उशिरा आले.    

-आर. व्ही. आढे, मुख्याध्यापक, वाई.