आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसूत महिलेने बालिकेला दूध पाजणे बंद केले, मिल्क सप्लिमेंटेशन सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड -  मुलगा बदल प्रकरणात मंगळवारी बीड जिल्हा रुग्णलयात दिवसभर प्रसूती कक्ष व नवजात अर्भक कक्षात रेकॉर्डची तपासणी करण्यात आली.  तसेच ११ मे  रोजी जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या १९ बाळांची चौकशी करण्यात आली आहे.  आईजवळील त्या बाळाच्या पायाचे ठसे व डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत  पाठवले जाणार असून त्यानंतर  बदलले बाळ मुलगा की मुलगी हे स्पष्ट होणार आहे.  दरम्यान, हे बाळ माझे नाहीच, असे म्हणत प्रसूत झालेल्या महिलेने स्तनपान देण्यास नकार दिल्याने त्या बालिकेला मिल्क सप्लिमेंटेशन दिले जात आहे.  

 

जिल्हा रुग्णालयातील नोंदीनुसार छाया राजू थिटे (२१ रा. भंडारी ता. सेनगाव जि. हिंगोली ह.मु. उपळी ता. वडवणी) या महिलेस  ११ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दुपारी साडेचार वाजता तिने एका बाळाला जन्म दिला.  बाळ केवळ एक किलो वजनाचे  भरल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातील शिशू विभागात काचेच्या पेटीत ठेवण्यात आले.  नंतर  पुढील उपचारासाठी नातेवाइकांनी  शहरातील  सुभाष रोडवरील डॉ. अभिजित थेटे यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून डॉ. थेटे यांनी बाळाला  बसस्थानकासमोरील  डॉ.सचिन जेथलिया यांच्या श्री बाल रुग्णालयात पाठवले. डॉ.जेथलिया यांच्या दवाखान्यातही   बाळाची तपासणी करून पायाचे ठसे घेतले व काचेच्या पेटीत (इन्क्युबेटर) ठेवले. डॉ.जेथलिया यांच्याकडे या बाळाची नोंद ‘फिमेल’ अशी करण्यात आली.  जन्मलेले बाळ मुलगा आहे, मुलगी नव्हती’ असे  बाळाच्या वडिलांनीच म्हटल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह  नर्स हादरल्या.  प्रशासनाने ११ मे रोजी जिल्हा रुग्णालयात  प्रसूती झालेल्या आई व वडिलांसह बाळांना  जिल्हा रुग्णालयात बोलावून घेत  तपासणी केली. मात्र या तपासणीत काहीच हाती आले नाही. 

 

बाळ आरामात जगू शकणार   
आईने बाळाला दूध पाजणे बंद केले तरी बाळाला इतर प्रसूत मातांचे दूध पाजले जाऊ शकते. ती व्यवस्था न झाल्यास मिल्क सप्लिमेंटेशनवर बाळ सहज जगू शकते. 
श्रीनिवास गडप्पा, प्रसूतीशास्त्र तज्ञ, घाटी रुग्णालय, औरंगाबाद

 

आईने सांभाळले नाही तर जिल्हा रुग्णालय सांभाळ करणार

आम्हाला मुलगाच झाला होता. आमच्याकडे आज मुलगी आहे. हे बाळ आमचे नाही म्हणत   छाया थिटे यांनी  त्या मुलीला दूध  पाजने बंद केले आहे. या मुलीला आम्ही सांभाळणार नसल्याचेही छाया यांनी म्हटले आहे.  मंगळवारी सायंकाळी खासगी रुग्णालयातून  त्या बालिकेची सुटी होणार असून त्या बालिकेला आईने सांभाळले नाही तर जिल्हा रुग्णालयातच तिचा सांभाळ केला जाणार आहे.

 

३६ तास उलटूनही छडा लागेना  
गेल्या ३६ तासांत या विषयावर अजूनही पडदा पडलेला नाही. आपल्याकडे  बाळ आले तेव्हा मुलगीच होती, असा दावा खासगी रुग्णालय करत आहे तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालय रेकॉर्डनुसार  मुलगा असल्याचे सांगत आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी  आता पोलिसही कामाला लागले असून जन्मावेळी घेतलेल्या पायांच्या ठश्यांसह डीएनए चाचणीपर्यंत तपास केला जाणार आहे.

 

रुग्णालयाच्या रेकॉर्डवर मुलगाच  
जिल्हा रुग्णालयातील डिलिव्हरी रूम मधील रेकॉर्डवर  बाळाचा उल्लेख मुलगाच आहे. नवजात अर्भक कक्षातही मुलगाच उल्लेख आहे.  परंतु बाळाचे पायाचे ठसे व डीएनए रिपोर्ट आल्यावर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल.
डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

बातम्या आणखी आहेत...