आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभरच्या वर घरफोड्या; स्वयंसेवी संस्था स्थापन करून सामाजिक कार्यातही दरोडेखोराचा हातखंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- विविध जिल्ह्यांत शंभरच्या वर दरोडे टाकून मोठ्या प्रमाणात कमाई करून घेतली. यानंतर सामाजिक कार्यातही हातभार म्हणून स्वयंसेवी संस्था स्थापन करून सामाजिक कार्यातही अग्रेसर राहणारा अवलिया दरोडेखोर जालना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. किशोर वायाळ (मेरा बु., जि. बुलडाणा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.   


जालना, औरंगाबाद, परभणी, सोलापूर या प्रमुख शहरांसह परराज्यातही आरोपी वायाळ याने घरफोड्या केल्या आहेत. हे काम लहानपणापासूनच करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यांबाबत विविध ठिकाणी गुन्हेही दाखल झालेले आहेत. दरम्यान, गुन्हे करण्यासोबतच या आरोपीने स्वयंसेवी संस्था स्थापन करून सामाजिक कार्यही केले असल्याचे आढळून आले. दरम्यान, जालना शहरातील प्रशांतनगरमधून अजून एकाच्या मदतीने पाच तोळे सोने नेले होते. या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी तपासाची चक्रे फिरवून ८ डिसेंबर रोजी त्याला मेरा बु. येथून ताब्यात घेतले. या चोरीतील काही चांदी त्या आरोपीने घरी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

 

तीन जिल्ह्यांतील पोलिस होते मागावर   
आरोपी किशोर वायाळ याचा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला फोटो सोलापूर पोलिसांनी काही पोलिस अधिकाऱ्यांना पाठवला होता. दरम्यान, सोलापूर गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी बुलडाणा पोलिसांनाही तो फोटो पाठवला होता. जालन्यातील घरफोडी प्रकरणात तो जालना गुन्हे शाखेच्या ताब्यात असल्याची माहिती बुलडाणा पोलिसांनी सोलापूर पोलिसांना दिली. त्यानंतर त्याने सोलापूर येथील घरफोडीचीही कबुली दिली.   

 

 

दुचाकीवरून येऊन भरदिवसा घरफोड्या   

बंद असलेले घर हेरायचे आणि भरदिवसा दुचाकीवर जाऊन ते घर फोडायचे अशी या आरोपीची चोरी करण्याची पद्धत होती. त्याने जालना शहरात जवळपास चार ते पाच घरफोड्या केल्या आहेत. त्याच्यासंदर्भात खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी त्याला त्याचा मेरा बु. या गावातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची 
कबुली दिली.    

 

 हे केले सामाजिक कार्य   
सदरील आरोपीने स्वयंसेवी संस्था तसेच वैयक्तिक पातळीवरून गावातील शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती याची दखल घेऊन या आरोपीने गावात बोअर मारून पाणी उपलब्ध करून दिले. तसेच अनेक गरिबांची लग्नेही लावून दिली. 

 

४५ ते ५० ठिकाणी गुन्हे दाखल   

या आरोपीने गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत गुन्हे करण्यासोबतच जालना, औरंगाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांतही गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या विविध गुन्ह्यांतून ५० ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. 

बातम्या आणखी आहेत...