आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटच्या भीतीने सीसीटीव्ही बंद; चोरट्यांनी पळवली दहा किलो चांदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थपुरी- तीर्थपुरी परिसरात अनेकदा रात्रीच्या वेळी शॉर्टसर्किट होते. यामुळे दुकान जळाल्याच्या घटना घनसावंगी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी घडल्या आहेत. दरम्यान, रोजच्याप्रमाणे गुरुवारी रात्री सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याने आभाळ आल्याने पावसाची शक्यता पाहून शॉर्टसर्किट होईल या भीतीने सीसीटीव्ही बंद करीत दुकान बंद करून घरी गेले. परंतु, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करून तीन लाखांची दहा किलो चांदी नेल्याची घटना गुरुवारी घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे घडली. 


गेल्या काही दिवसांपासून तीर्थपुरी परिसरात चोऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. या घटनांमुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, तीर्थपुरी येथील मध्यवस्तीत असलेल्या सराफा मार्केटमधील गणेशराव आडाणी यांच्या न्यू वैभव ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाचे चोरट्यांनी मध्यरात्री शटर वाकवून आत प्रवेश करीत लोखंडी कपाटात ठेवलेली रोख दीड हजारांची चिल्लर, ३ लाख रुपयांच्या दहा किलो वजनाच्या चांदीच्या चैन चोरून नेल्या. तीर्थपुरी गावातील येथे मध्यवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर शुक्रवारी सकाळी गोंदीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल परजने, सहायक पोलिस निरीक्षक विजय गायकवाड, जमादार डी. के. हवाले, बी. व्ही. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले. श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला. वैभव आडाणी यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, धाडसी चोरीची घटना घडल्याने सराफा व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेच्या निषेधार्थ सर्व सराफा व्यापाऱ्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी.सेवगण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी भेट देऊन माहिती घेतली. 


अर्धा दिवस आंदोलन 
या घटनेच्या निषेधार्थ २५० व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत बंद पाळला. वाढत्या घटनांवर आळा बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याचा संताप व्यक्त केला. 


परिसरात १४ चोऱ्या 
वर्षभरात कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी परिसरात आतापर्यंत १४ चोऱ्या झाल्या आहेत. या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...