आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1952 मध्ये दोन खोल्यांत सुरू शाळेत आज साडेसहा हजार विद्यार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन खोल्यांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांवर १९५२ मध्ये शाळा सुरू करताना मास्तर म.शं.शिवणकर यांनी खोल्यांच्या सारवणापासून ते शिक्षकांसाठी भिक्षा मागण्यांपर्यंतची कामे केली. त्यांनी स्थापन केलेल्या रोपट्याचा वेलू गगनावरी गेला. आज मराठवाड्यातील नामांकित संस्था असलेल्या बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेत तब्बल ६५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मास्तरांच्या या ध्येयवादाची जोपासना करण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने प्रतिष्ठान सुरू करत पहिला पुरस्कार सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळास रविवारी (दि.२४) बहाल केला.   


शाळेचे माजी विद्यार्थी व राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ.वि.ल.धारूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत म.शं.शिवणकर स्मृती पुरस्काराचे वितरण शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले.

  
वडिलांच्या सराफी व्यवसायात न रमलेल्या शिवणकर मास्तरांनी दोन विद्यार्थ्यांच्या शिकवणीपासून सुरुवात केली. दासराव बारबिंड व गोविंदराव कुलकर्णी या  मित्रांसोबत त्यांनी १९५२ मध्ये बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. दोन खोल्यांत काही विद्यार्थ्यांवर सुरू केलेल्या या शाळेला १९५६ मध्ये शासकीय मान्यता मिळाली. १९६० मध्ये पहिले १३७० रुपयांचे शासकीय अनुदान मिळाले. पण हे अनुदान कधीच वेळेवर मिळत नसे. सहा सहा महिने शिक्षकांना पगाराविना काम करावे लागत असे. मात्र, शिक्षक व विद्यार्थी हा ध्यास घेऊन मास्तरांनी  लोकांकडून पैसे जमा करून अगदी शिक्षकांच्या घरी किराणा साहित्य पोहोचवण्यापर्यंतचे काम केले.   


मास्तर त्यांच्या तीन चाकी सायकलरिक्षात  बसून  अक्षरशः: झोळी घेऊन  निधी जमा केला होता.  आज या शाळेचा लौकिक केवळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात झाला. हजारो विद्यार्थी घडले.   मास्तरांच्या या ध्येयवेडया कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी म.शं.शिवणकर प्रतिष्ठान स्थापन केले.


माणसं उभी करण्याची प्रेरणा : .डॉ. धारूरकर  
अशक्य ते शक्य करून दाखवण्याची प्रतिभाशक्ती मास्तरांमध्ये होती. त्यांच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती होती. स्वत अपंग असूनही माणसं उभी करण्याची प्रेरणा होती. त्याच आत्मप्रेरणेतून मूल्यप्रेरणेने त्यांनी कार्य केले. शिक्षण हे शाश्वत विकासाचे साधन आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी ध्येयवाद जोपासला. ते शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व ठरले.


मराठवाड्यातील संस्थेचा गौरव  
डॉ.सचिन पाठक यांच्यासह माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून प्रतिष्ठान स्थापन करीत असताना ध्येयवेडया मास्तरांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनाच मिळावी, यासाठी मराठवाड्यातील एका चांगल्या शिक्षण संस्थेला ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची कल्पना पुढे आली. मात्र, कोणतेही प्रस्ताव न निवडता एका कंपनीकडून संस्थांचा सर्व्हे करून सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाची निवड प्रतिष्ठानने केली. ५१ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मंडळाचे श्री शिंदे पाटील, सुनील देशमुख यांना गौरवण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...