आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटरच्या गरम पाण्याने तीन नातींचा बळी, आजोबांच्या जवळील दोन नातवंडे वाचली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- वादळी वाऱ्यामुळे परळीहून उजनी २२ के.व्ही केंद्राकडे जाणारे विजेचे खांब जमिनीवर कोसळून उजनी बरोबरच भतानवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला. बुधवारी गेलेली गावातील वीज शुक्रवारी मध्यरात्री अचानक आली तेंव्हा गावातील भताने कुटुंबाच्या घरी हिटरचे बटण तसेच विसरून राहिल्याने हिटरमधील उकळते पाणी घरात झाेपलेल्या तीन मुलींसह एका महिलेच्या अंगावर पडल्याने चौघीही गंभीर भाजल्या. 


लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तीनही मुलींचा एकापोठोपाठ एक मृत्यू झाला असून कुटुंबाचा निष्काळजीपणा मुलींच्या जिवावर बेतला आहे. यातील दोन मुली गुरुवारी त्यांच्या गावी जाणार होत्या. घरात दोन नातवंडे आजी- आजोबाजवळ झोपल्याने ती या घटनेतून वाचली आहेत. तालुक्यातील उजनी ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत ११ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. ४ जून रोजी उजनी भागात वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे नुकसान झाले. वादळामुळे अकरा गावांत तीन दिवस वीजपुरवठा खंडित झाला. उजनी केंद्राअंतर्गत सुरू असलेला भतानवाडी येथील वीजपुरवठाही बुधवारी बंद झाला. वीज गेल्याने संभाजी दत्तू भताने यांच्याकडून घरातील हिटरचे बटण बंद करण्याचे राहून गेले होते. 


तीन दिवस वीजच आली नसल्याने या बटणाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. शुक्रवारी सकाळी संभाजी भताने यांच्या कुटुंबातील सर्वच लोक शेतामध्ये पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शेतात निघून गेले होते. दिवसभर शेतात काम करून थकून घरी आले. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जेवण करून संगीता संभाजी भताने (वय ३०), आदिती संभाजी भताने (वय ४) व भाची दुर्गा बिभीषण घुगे ( वय १०) , धनश्री राजेंद्र केदार (वय ११ )या तीन मुलींसह संगीता भताने या स्वयंपाक घराच्या बाजूच्या खोलीत झोपलेल्या होत्या. दिवसभर काम केल्याने थकून गेलेल्या संगीताला झोप लागली मध्यरात्री वीज केंव्हा आली हे कळालेच नाही. वीज येताच कॅनमध्ये लावलेल्या हिटरमधील पाणी गरम होण्यास सुरुवात झाली. उकळत्या पाण्यामुळे कॅन खाली पडून गरम पाणी खोलीत झोपलेल्या तिन्ही मुलींच्या अंगावर गेल्याने त्यांच्यासह झोपेतील संगीता भताने अशा चौघी गंभीरपणे भाजल्या गेल्या. 


रात्री भाजल्या गेल्याने मुली व तिच्या मामीने आरडाओरड केली. तेंव्हा सासरे दत्तुराम भताने व सासू वैजनाथ दत्तू भताने हे घरासमोर बाज टाकून झाेपले होते. घरात लहान लेकरांचा किंकाळ्या एेकून आजी-आजोबा घरात गेले तेंव्हा तीन मुलींसह सूनही उकळत्या पाण्याने भाजल्याचे त्यांना दिसून आले. शेजाऱ्यांनी वाहन बोलावून चौघांना अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु तिन्ही मुली गंभीररीत्या भाजल्यामुळे त्यांना लातूरला घेऊन जाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. तेंव्हा तिन्ही मुलींना लातूरला हालवले. उपचारादरम्यान अदिती हिचा शनिवारी, दुर्गाचा मंगळवारी तर धनश्रीचा मृत्यू बुधवारी झाला असून संगीता संभाजी भताने यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत. 


आजोबांनी थंड पाणी अंगावर टाकले 
भतानवाडी येथील आजोबा दत्तू भताने हे शुक्रवारी रात्री घरातून नातींचा मोठमोठ्याने रडतानाचा आवाज येत असल्याचे पाहून झोपतून उठले तेंव्हा दार उघडून त्यांनी आत पाहिले तिन्ही नाती गंभीरपणे भाजलेल्या होत्या. तेंव्हा त्यांना काय करावे हेच सूचेना त्यांनी हे पाहून त्यांनी बाहेरच्या टाकीतील थंड पाणी नातीच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलींच्या किकाळ्या काही थांबल्या नाहीत. शेवटी तिन्ही नातींना घराच्या बाहेर काढत रुग्णालय गाठले. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 


आजोबाजवळ झोपलेले २ नातवंडे वाचली 
भतानवाडी येथील संभाजी भताने यांना एक मुलगा दोन मुली असून आदिती ही मुलगी आईसोबत घरात झोपली होती. तर एक मुलगा दुसरी मुलगी हे दोघे आजी आजोबा सोबत बाहेर झोपल्यामुळे हे दोघेही बचावले. मात्र आई जवळ झोपलेल्या अदितीचा गरम पाणी अंगावर पडल्याने मृत्यू झाला. 


दोन्ही मुली आपल्या गावी जाणार होत्या 
सोनपेठ तालुक्यातील सोनखेड येथील बिभीषण घुगे यांना दोन मुले एक मुलगी असून यातील एक मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी भतानवाडी येथील आजोळी आली होती. तर राजेंद्र केदार (रा.होट्टी ता.चाकूर )यांना दोन मुली एक मुलगा असून त्यातील धनश्री ही मुलगी आजोळी आली होती या दोन्ही मुली गुरुवारी त्यांच्या गावी जाणार होत्या. मात्र या दोन्ही चिमुकल्यावर काळाने घाला घातला. 


पत्र्याच्या खाेलीत संसार 
दत्तू भताने यांना जेमतेम तीन एकर शेती असून शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. राहण्यासाठी पाच बाय दहाच्या दोन खोल्या असून या दोन खोल्यामध्येच हे कुटुंब वास्तव्यास आहे. एकीकडे शासन मागेल त्याला घर देत असताना या कुटुंबाला अद्यापही घरकुलची सुविधा मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या मुलासह हे आजी-आजोबा पाच बाय दहाच्या खोल्यामध्येच राहत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...